खामगाव (जि. बुलडाणा) : लग्न जुळत नसल्याच्या निराशेतून एका वैफल्यग्रस्त तरुणाने पेट्रोल अंगावर ओतून शेतात आत्मघात केला. गुरुवारी सकाळी ही घटना खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे उघडकीस आली. या तरुणाने आत्मघात करण्यापूर्वी स्वत:चे सरण रचल्याचीही चर्चा परिसरात आहे.
खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (२७) हा तरुण गत काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने निराश होता. शेतात कामाला जातो म्हणून महेंद्र बुधवारी घराबाहेर पडला. सायंकाळी त्याने स्वत:च्या शेतात अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर जवळच असलेल्या तुरीच्या गंजीनजीक त्याने स्वत:ला पेटवून घेतले. दरम्यान, आगीत होरपळण्याच्या वेदना असह्य झाल्याने प्रचंड आरडाओरड करत त्याने जवळच असलेल्या पाण्याच्या स्रोताजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वीच शेणखताच्या ढिगाऱ्यावर कोसळून तो जागीच गतप्राण झाला.
गुरुवारी सकाळी काहीजणांनी त्याचा मृतदेह बघितला. महेंद्र याच्या पश्चात नामदेव कोंडीराम बेलसरे (८०) व धृपदाबाई नामदेव बेलसरे (७२) हे आई-वडील आणि एक विवाहित बहीण असून, त्याने आत्मघात का केला? याचा पोलीस शोध घेत आहेत. नैराश्येतून तरुणाने आत्महत्या केल्याचा दावा पोलीस सूत्रांकडून केला जात आहे. शेगाव येथे बहिणीकडे गेल्यानंतर त्याने लग्न जुळत नसल्याची खंत बहीण जावई धनंजय शेडे (४३) यांच्याकडे व्यक्त केली होती. शेगाव येथून परतल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
जीव वाचविण्यासाठी आकांताने धडपड! आगीचे चटके असह्य झाल्याने तो जिवाच्या आकांताने शेतात इतरत्र धावू लागला. पाण्याच्या स्रोताजवळ पोहोचण्यापूर्वीच तो गतप्राण झाला. वेदना असह्य झाल्याने पऱ्हाटी, तुराटीच्या गंजीवरून उडी घेत तो पाण्याच्या स्रोताजवळ आल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.२०२०च्या घटनेची आठवण खामगाव तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयपूर लांडे येथे ११ जून २०२० रोजी एका वृद्ध दाम्पत्याने स्वत:चे सरण रचून आत्मघात केल्याची चर्चा होती.