मुंबई : बाळंतपणासाठी मुलगी घरी येणार म्हणून कुटुंबीयांनी तयारी सुरू केली. कुठे बाबा तर कुठे आजी आजोबा होणार म्हणून कुटुंबीय आनंदात होते. मात्र, त्यापूर्वीच मुलीच्या हत्येची बातमी कानावर पडली आणि कुटुंबीयांना मुलीच्या बाळंतपणाऐवजी सरणाची तयारी करण्याची वेळ ओढावल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. अनैतिक प्रेमसंबंधातून मावस दिरानेच बाळंतपणासाठी जाऊ नये म्हणून ८ महिन्यांच्या गर्भवतीची हत्या केली. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कुर्ला पश्चिमेकडील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात कोमल सोनकर (२०) कुटुंबीयांसोबत राहते. कोमल ८ महिन्यांची गर्भवती असल्याने घरामध्ये सगळे जण आनंदात होते. त्यामुळे तिच्या बाळंतपणाची तयारीची घरात लगबग सुरू झाली. गुरुवारी कोमल बाळंतपणासाठी आईकडे गावी जाणार होती. मुलगी घरी येणार म्हणून गावाकडे आईवडिलांनीही तिची येण्याची तयारी केली होती. मात्र, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कोमलचा मृतदेह आढळला. घटनेची वर्दी लागताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कोमलचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात नेला. तेथे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळा दाबून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली. कोमलचे पती संजय यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला.
म्हणून केली हत्या अर्जुनचे कोमलसोबत अनैतिक संबंध होते. बुधवारी जेवणाच्या बहाण्याने अर्जुन घरी आला. २८ तारखेला कोमल बाळंतपणासाठी गावी जाणार होती. मात्र, अर्जुनने त्याला नकार दिला. यावरून दोघांमध्ये खटके उडाले. याच रागातून त्याने कोमलची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामध्ये कोमलच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे.
अशी झाली उकल कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करत आरोपीचा शोध सुरु केला. यामध्ये संजयचा मावसभाऊ अर्जुन दुपारच्या सुमारास घरी जेवणासाठी आला असल्याची माहिती पथकाला मिळाली. संजय आणि अर्जुन हे दोघेही कॉटन ग्रीन येथील एका चहाच्या दुकानात काम करतात. पथकाने अर्जुनचा शोध सुरु केला. त्याचा मोबाईल क्रमांक बंद लागल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याच्या मालकाकडे चौकशी केली तेव्हा, तो दोन हजार रुपये घेऊन गावी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गावाला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेत चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.