Nashik Crime : ग्रामीण भागात गावोगावी थंडीच्या दिवसात यात्रा भरवल्या जातात. यात ग्रामीण भागासह शहरातील हौशी मंडळी हजेरी लावून यात्रेचा आनंद लुटतात. यावेळी भुरट्या चोरट्यांसह प्रेमीयुगलही या संधीचा फायदा घेऊन उद्दिष्ट साधण्याचा प्रयत्न करत असतात. भरदिवसा यात्रेत एका प्रेमीयुगलाने अनोखी शक्कल लढवून आपल्या प्रेयसीला बुरखा परिधान करत यात्रेत फिरवण्याचे धाडस केले, मात्र त्यांचा तो प्रयोग फ्लॉप ठरला.
सटाणा शहरातील यात्रेत भरदिवसा दुसऱ्या तालुक्यातील एक प्रेमीयुगल दाखल झाले. कोणाच्या नजरेत यायला नको म्हणून प्रेयसीला बुरखा परिधान करून यात्रेत शिरले. यात्रेत फिरत असताना वेडेवाकडे चाळे करत असताना काही व्यापाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी काही काळ जोडप्यावर पाळत ठेवली. मात्र, त्यांच्या खोडसाळपणामध्ये कोणताही बदल न झाल्याने व्यापाऱ्यांनी प्रेमीयुगलास यात्रेतून बाहेर काढत त्यांची ओळख परेड घेतली असता ती बुरखा घातलेली मुलगी त्या समाजाची नसून ती दुसऱ्या समाजाची असल्याचे त्यांच्या बोलण्यातून सिद्ध झाले.
दरम्यान, तुम्ही बुरखा घालून केलेल्या कृत्यामुळे एका विशिष्ट समाजाचे संस्कार वेशीला टांगले. तुम्ही केलेला प्रकार चुकीचा असून काहींनी त्यांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांची समज; दिले पालकांच्या ताब्यात
प्रेमीयुगलास पोलिस स्टेशनला आणून त्यांच्या आई वडिलांना बोलावून समज देत ताब्यात दिले. यात्रेत अफवा अथवा कोणतेही गैरकृत्य तसेच दोन समाजात तेढ निर्माण होऊन भावना दुखावल्या जातील असा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिला.