नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या दुनियेत तरुणांसाठी आपल्या पोस्टवरील लाईक्स आणि व्ह्यूज खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्यासाठी लोकप्रियता पाहण्यासाठी सुद्धा या लाईक्स आणि व्ह्यूज आहेत. याच लोकप्रियतेत म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आयआयटीएम ग्वाल्हेरच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. या विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येचे एकमेव कारण म्हणजे त्याच्या यूट्यूब चॅनलला व्ह्यूज कमी मिळत होते, असे सांगण्यात येत आहे.
आयआयटीएम ग्वाल्हेरमध्ये शिकणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आपले SELFLO यूट्यूब चॅनल तयार केले होते. या विद्यार्थ्याला अपेक्षा होती की, आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप व्ह्यूज मिळतील, त्याचा कंटेंट लवकरच व्हायरल होईल. पण अपेक्षेप्रमाणे काही घडले नाही, त्यामुळे तो अस्वस्थ होऊ लागला. त्यांची मानसिक स्थिती ढासळू लागली. मात्र, त्यावेळी नाराज होऊन विद्यार्थी आत्महत्येसारखे पाऊल उचलेल, असे कोणालाच वाटले नव्हते. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर त्याला घरातूनही फारशी साथ मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्याच्या पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले नाही.
दरम्यान, याप्रकरणी सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दुसरीकडे, या विद्यार्थ्याचा मृतदेह उस्मानिया रुग्णालयात हलवण्यात आला आहे. तेथे शवविच्छेदन करून पुढील तपास करण्यात येईल. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कॉलेज प्रशासनानेही या आत्महत्येबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.