Yuvraj Singh Mother receives Threat Calls, Msg: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंग याची आई शबनम सिंग यांच्यासोबत फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी गुरुग्राममधील डीएलएफ फेज-1 पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हेमा उर्फ डिंपी असे आरोपी महिलेचे नाव आहे. शबनम सिंग यांच्याकडे ४० लाखांची मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने शबनम सिंह यांची बदनामी करण्याची धमकी देऊन 40 लाख रुपयांची मागणी केली होती. यानंतर युवराजच्या आईने पैसे जमा व्हावेत म्हणून आरोपी महिलेकडे काही दिवसांचा अवधी मागितला. या दरम्यान, सुरुवातीला पाच लाख रुपये दिल्याची चर्चा असताना आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.
गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि सांगितले की, आरोपी महिलेला युवराज सिंहचा भाऊ जोरावर याच्या देखरेखीसाठी कामावर ठेवण्यात आले होते, परंतु तिला 20 दिवसांच्या आतच कामावरून काढून टाकण्यात आले. युवराज सिंगचे घर डीएलएफ फेज-१ मध्ये आहे. येथे 2022 मध्ये हेमाला युवराजचा भाऊ जोरावर सिंगची काळजी घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. जोरावर डिप्रेशनमधून जात होता आणि त्याच्या रिकव्हरी दरम्यान त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हेमाला केअरटेकर म्हणून ठेवण्यात आले होते. मात्र, 20 दिवसांनंतर हेमाला कामावरून काढून टाकण्यात आले.
हेमा केअरटेकरच्या कामात पारंगत नव्हतीच, पण ती युवराजच्या भावाला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होती असे सांगण्यात येत आहे. कुटुंबाला त्रास देण्यासाठी ती शबनम सिंग यांना मेसेज आणि कॉल करत असे. कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवून संपूर्ण कुटुंबाची बदनामी करेन, अशी धमकीही तिने दिली. हेमाने शबनम सिंहसमोर अट ठेवली की, जर तुम्हाला बदनामी टाळायची असेल तर तुम्ही मला 40 लाख रुपये द्या. 23 जुलैपर्यंत पैसे न मिळाल्यास गुन्हा नोंदवेन असंही हेमाने सांगितले.
पोलिसांनी रंगेहाथ पकडलं!
संपूर्ण कुटुंबाची बदनामी होईल हे शबनम सिंग यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी, पैसे जास्त आहेत, त्यामुळे ते जमवायला वेळ लागेल असे सांगितले. यानंतर सुरुवातीला 5 लाख रुपये देण्याची चर्चा झाली आणि हेमा 5 लाख रुपये घेण्यासाठी आल्यावर पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. मात्र, नंतर तिला पोलिसांकडून जामीन मिळाला.