दिल्ली : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड जफर हयात हाश्मी याला पोलिसांनीअटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 3 एफआयआर नोंदवले आहेत. 36 ज्ञात आणि 1500 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी जफर हयात हाश्मी याने फेसबुक पोस्टद्वारे लोकांना कानपूरमधील बाजार बंद करून जेल भरो आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले की, 18 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनांशी संबंध असून काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीस अधिकारी पुढे म्हणाले, "परिस्थिती शांततापूर्ण आहे आणि आम्ही चोवीस तास त्यावर लक्ष ठेवून आहोत." सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी काल रात्री किमान 12 संशयितांना ताब्यात घेतले. तिवारी पुढे म्हणाले की, बेकनगंज पोलीस ठाण्यात दंगल आणि हिंसाचारासाठी 500 हून अधिक लोकांविरुद्ध तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.पहिला एफआयआर स्टेशन प्रभारी (बेकनगंज) नवाब अहमद यांनी सुमारे 500 लोकांविरुद्ध नोंदवला आहे आणि त्यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी दंगल केल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर लगेचच झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात मौलाना मोहम्मद अली (एमएमए) जौहर फॅन्स असोसिएशनचे प्रमुख हयात जफर हाश्मी, त्यांचे सहकारी युसूफ मन्सूरी आणि अमीर जावेद अन्सारी यांच्यासह 36 जणांची एफआयआरमध्ये नावे आहेत. एसएचओने सांगितले की, हयात आणि त्याच्या समर्थकांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह टिपण्णीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, दंगलखोरांनी प्राणघातक शस्त्रे वापरली, पेट्रोल बॉम्ब फेकले आणि रस्त्यावर गोंधळ घातला, ज्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली.पोलिस उपनिरीक्षक (एसआय) आसिफ रझा यांनी नोंदवलेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये, दंगलीच्या संदर्भात 350 अनोळखी लोकांव्यतिरिक्त 20 जणांची नावे घेऊन एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एसआयने आपल्या एफआयआरमध्ये आरोप केला आहे की, एमएमए जौहर फॅन्स असोसिएशनचे प्रमुख हयात जफर हाश्मी, युसूफ मन्सूरी, अमीर जावेद अन्सारी आणि इतर दादा मियांसह चौकाचौकात जमले आणि यतीम-खाना परिसरात दुकानदारांना त्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडले. त्यामुळे अराजकता पसरली.तिसरा एफआयआर चंदेश्वर हाटा रहिवासी मुकेश यांनी दाखल केला आहे, ज्याने आरोप केला आहे की, शेकडो मुस्लिमांनी इतर समाजातील लोकांवर लाठ्या, लोखंडी सळ्या आणि प्राणघातक शस्त्रे, पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक करून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ले केले. एफआयआरमध्ये "हजारो अज्ञात व्यक्तींच्या जमावाचा" आरोपी म्हणून उल्लेख आहे.भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी नुकत्याच टीव्हीवरून प्रसारित झालेल्या चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारच्या नमाजानंतर जबरदस्तीने दुकानं बंद करू लागले, तेव्हा परेड, नई सडक आणि यतीमखाना भागात निर्माण झालेल्या संघर्षांमध्ये पोलिस कर्मचार्यांसह किमान 40 लोक जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.
कानपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड जफर हयातला अटक, फेसबुक पोस्टद्वारे लोकांना भडकावल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 6:58 PM