लश्कर ए तोयबाचा कमांडर आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला (६१) टेरर फंडिंगप्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयाने १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. टेरर फंडिंगसंबंधीत एका प्रकरणात लख्वीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शुक्रवारी म्हणजेच आज लख्वीला ही शिक्षा ठोठावली आहे.
२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा लख्वी हा मास्टरमाइंड आहे. लाहोरमध्ये लख्वीविरोधात टेरर फंडिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो डिस्पेंसरीच्या नावाखाली पैसे गोळा करत होता आणि त्या पैशांचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा पैसा वापरण्यात येत होता.
संयुक्त राष्ट्रांनी लख्वीला दहशतवादी म्हणून केले घोषित
संयुक्त राष्ट्रांनी देखील जकी उर रहमान लख्वीला दहशतवादी घोषित केले होते. मात्र, त्याच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याने तो बिनधास्त फिरत होता. मात्र, काळ्या यादीत जाण्याची भीती असल्याने पाकिस्तानने एफएटीएफच्या (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) बैठकीपूर्वी लख्वीला अटक केली आहे.