नवी दिल्ली - वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकविरोधात गुरुवारी राष्ट्रीय तपास पथकाकडून (एनआयए) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रानुसार अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिग कायद्यांतर्गत झाकीर नाईकच्या 193.06 कोटी रुपयांच्या मालमत्तेची ओळख पटवली आहे. या मालमत्तेवर झाकीर नाईकचा मालकी हक्क असल्याचे ईडीने सांगितले असून त्यापैकी 50.46 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
याआधी मार्च २०१९ साली ईडीने झाकीर नाईकच्या एका सहकाऱ्याला मुंबईतून अटक करण्यात आली होती. व्यवसायाने सोनार असलेल्या नजमुद्दीनला पैशांच्या अफरातफरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. झाकीर नाईकला मदत करणे आणि मनी लॉड्रींगमध्ये त्याला साहाय्य करणे असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. १८ नोव्हेंबर २०१६ रोजी एनआयएने नाईकविरोधात गुन्हा दाखल केला होता. चिथावणीखोर, भडकाऊ भाषणे दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. देशविरोधी कारवाया करणे, धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्ये करणं, कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचवणारी कृत्ये करणे, दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे आणि काळा पैसा सफेद केल्याचा आरोपही नाईकवर ठेवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून झाकीर नाईक देशाबाहेर म्हणजेच मलेशियात लपून बसला आहे.