मुंबई : झवेरी बाजारातील बुलियन मार्केटमधील लूट प्रकरणात चोरीची रोख रक्कम सव्वादोन कोटींवर गेली आहे. यापैकी १ कोटी ९० लाख रुपये जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे तर या प्रकरणातील फरार आरोपी अकबर, राजा आणि फईम यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
येथील खाऊ गल्लीमध्ये व्हीबीएल बुलियन नावाने सोने दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विराट माली या व्यावसायिकाला ‘टार्गेट’ करत सहाजणांच्या टोळीने २३ जानेवारी रोजी ईडीचे अधिकारी बनून ३ किलो सोने आणि रोख रकमेची चोरी करून पसार झाले होते. ज्या कारमधून चोरटे पसार झाले ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी सुरुवातीला मास्टरमाईंड डोंगरीतील रहिवासी मोहम्मद फजल सिद्दीक गिलीटवाला (५०) याच्यासह मालाडमधील रहिवासी मोहम्मद रजी अहमद मोहम्मद रफीक उर्फ समीर (३७) आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील रहिवासी असलेल्या विशाखा मुधोळे हिला अटक केली आहे.
तिन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत. सुरुवातीला २५ लाखांच्या रोख रकमेचा उल्लेख दाखल गुन्ह्यात होता. मात्र, राजस्थानला गेलेले विराट माली यांनी मुंबईत येत चौकशी करताच एकूण २ कोटी २५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी १ कोटी ९० लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली असून, उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे.
आरोपी निघाली माजी नगरसेवकाची पत्नी खेडमधील रहिवासी असलेल्या मुधोळे हिचे पती नगरसेवक होते. त्यांचे सहा महिन्यांपूर्वीच कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानंतर आर्थिक चणचण असल्याने ती या आरोपींसोबत लुटीच्या कटात सामील झाली. तिच्या सहभागामुळे आरोपींना कामगारांवर दबाव टाकण्यात मोठी मदत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार फजल याची ती मैत्रीण असून, फजल याने तिला लुटीतील वाटा देण्याचे कबूल केले होते. तिच्याकडून १० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
दुसरा गुन्हा दाखलदोन ठिकाणी ही चोरी झाल्यामुळे एल. टी. मार्ग पोलिसांनी टोळीविरोधात दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.