धाराशिव - धाराशिव पंचायत समितीअंतर्गत राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून पाच गावांमध्ये शाेषखड्ड्यांची कामे करण्यात आली. मात्र, या कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर चाैकशी करण्यात आली. चाैकशीअंती सुमारे १ काेटी १२ लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. तत्कालीन सहाय्यक बीडीओंसह चाैघांवर गैरप्रकाराचा ठपका ठेवून अपहारित रक्कम शासनखाती जमा करण्याबाबत आदेशित केले. ताेवर संबंधितावर पाेलीस कारवाई करू नये, अशा सूचना हाेत्या. दरम्यान, संबंधितांनी केवळ ७५ लाख ७० हजार रूपये शासनखाती जमा केले. उर्वरित रक्कम न भरल्याने अखेर गुरूवारी रात्री उशिरा आनंदनगर पाेलीस ठाण्यात तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नाेंदविण्यात आला.
राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून धाराशिव तालुक्यातील खेड, मेडसिंगा, उपळा, ढाेकी आणि बेंबळी अशा पाच गावांमध्ये शाेषखड्ड्यांची कामे मंजूर करण्यात आली हाेती. मात्र, कामे न करताच पैसे लाटल्याची तक्रार झाल्यानंतर चाैकशीचे आदेश देण्यात आले हाेते. चाैकशीअंती सुमारे १ काेटी १२ लाखांचा गैरप्रकार झाल्याचे समाेर आले हाेते. हे पैसे संबंधितांनी मजुरांच्या खात्यावर जमा न करता आपल्या हितसंबंधातील लाेकांच्या नावे जमा करून अपहार केल्याा ठपका पंचायत समितीचे तत्कालीन सहाय्यक गटविकास अधिकारी एस. डी. तायडे, सहाय्यक लेखा अधिकारी आर. जे. लाेध, डाटाइंट्री ऑपरेटर व्ही. डी. राऊत यांच्यावर ठेवत प्रत्येकी ३७ लाख ४२ हजार रूपये एवढी रक्कम शासनखाती जमा करण्याचे निर्देश दिले हाेते. दरम्यान, प्रशासनाकडून पाेलीस कारवाईची तयारी सुरू असतानाच शासनाकडून रक्कम वसूल हाेईपर्यंत कारवाई करू नये, अशी सूचना पत्राद्वारे केली हाेती. दरम्यानच्या काळात तिघांनी मिळून ७५ लाख ७३ हजार रूपये शासनखाती जमा केले. मात्र, उर्वरित ३६ लाख ५८ हजारांचा भरणा केला नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक प्रकशासन अधिकारी संजय घाेंगडे यांनी आनंदनगर पाेलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरून उपराेक्त तिघांविरूद्ध शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पाेलीस निरीक्षक यशवंत बारवकर यांच्याकडे साेपविण्यात आला आहे.
काेणत्या गावात किती लाखांचा घाेटाळा..?
खेड ग्रामपंचायतीअंतर्गत २० लाख ६७ हजार, मेडसिंगा १० लाख ५ हजार, उपळा ३३ लाख ९१ हजार, ढाेकी २५ लाख ७५ हजार तर बेंबळी ग्रामपंचायतीअंतर्गत २१ लाख ८८ हजारांचा गैरप्रकार झाला आहे. यापैकी ७५ लाख ७३ हजार रूपये एवढी अपहारित रक्कम तिघांनी मिळून शासनखाती जमा केली आहे.