उस्मानाबाद : सगळीकडेच कोरोनाबाधित नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातही काही वेगळे चित्र नाही. त्यामुळे लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक आहे. मतदारसंघातील सुमारे १० लाख १३ हजार नागरिकांचे लसीकरण राहिले आहे. त्यामुळे तातडीने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंतप्रधान व केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे गुरुवारी केली आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उस्मानाबाद जिल्ह्यासह लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, खासगी रुग्णालयातही सध्या बेड अपुरे पडत आहेत. हे थांबविण्यासाठी लसीकरण गतीने होणे आवश्यक आहे. सध्या ४५ वर्षे वयोगटावरील सर्व नागरिकांना लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस लवकर द्यावा लागेल. उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप ९ लाख ३१ हजार ७७४ नागरिक शिल्लक आहेत. औसा व निलंगा तालुक्यांत २ लाख ६ हजार ८०२ तर बार्शी तालुक्यात १ लाख १ हजार २ असे मतदारसंघातील एकूण १२ लाख ३९ हजार ५७८ जणांना लस देणे आवश्यक आहे. परंतु, आतापर्यंत केवळ २ लाख २५ हजार ७१६ व्हॅक्सिन उपलब्ध झाल्या. आणखी १० लाख १३ हजार ८६२ एवढ्या लसींची आवश्यकता आहे. तसेच ४५ वर्षांवरील पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन केंद्राकडे वारंवार मागणी करीत आहे. परंतु, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. ही बाब लक्षात घेता तातडीने लसींची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी खा. राजेनिंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.