उस्मानाबाद : शेतमजूर, कामगारांना कामगार मंडळाकडून प्रति महिना एक हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, शेतमजूर व कामगारांना दररोज काम मिळेलच याची शाश्वती नसते. परिणामी, त्यांना आर्थिक अडीअचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतमजूर, कामगारांना कामगार मंडळाकडून एक हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, विधवा महिलांना वृध्दपकाळ, संजय गांधी पेन्शनमध्ये वाढ करुन २ हजार रुपये प्रतिमहिना देण्यात यावी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीस व मुला-मुलींना महिन्याला ६०० रुपये मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, १५ वर्षापासून बंद असलेला तेरणा कारखाना शासनाने तात्काळ सुरु करावा, मराठा समाजाला मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने न्यायालयात ठोस बाजू मांडावी, आदी मागण्या लावून धरल्या होत्या. यावेळी युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मळगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.