तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कवी अभिजित गाटे यांची ‘विठ्ठला’ ही कविता समाजमाध्यमावर चांगलीच गाजत असून, आतापर्यंत दोन लाख चाहत्यांनी लाइक, तर दहा हजार वाचकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. शिवाय नऊ हजार शंभर लोकांनी ही कविता शेअर केली आहे.
काटी येथील रहिवासी असलेले अभिजित गाटे हे बार्शी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आजवर नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या वेदना व समस्यांशी निगडित पन्नासेक कवितांचे सादरीकरण केले असून, ‘विठ्ठला, काय हवंय तुला, जरा सांगशील का मला’, या कवितेतून त्यांनी शेतकऱ्यांची वेदना मांडली आहे. समाज माध्यमाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांची ही कविता पोहोचली आहे. जागतिकीकरणाच्या झपाट्यात उद्ध्वस्त होत जाणाऱ्या शेती व्यवस्थेचे चित्रण त्यांच्या कवितेत येते. शेतकऱ्यांवर अस्मानी आणि कोरोनासारख्या सुलतानी संकटांना निमूटपणे सहन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी आदरयुक्त भावना व्यक्त करून त्यासंबंधीचा जाब त्यांनी या कवितेतून विठ्ठलाला विचारला आहे.