मुरूम : शहरात लॉकडाऊनचे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसात केवळ दोनच कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने शहरवासीयांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत १५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरातील ग्रामीण रुग्णालयात रविवारी बारा जणांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील आठ व आलूर येथील चार अशा बारा जणांचा समावेश होता. केवळ आलूर येथील एका तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शहरातील आठ व आलूर येथील तीन अशा अकरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २०५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. यापैकी १५५ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, पाच जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
शहरात सध्या ४५ रुग्ण उपचाराखाली असून यात कोविड सेंटरमध्ये २५ ,घरामध्ये १८ आणि दोन जण उमरगा येथे उपचार घेत आहेत. शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी नगरपरिषद आणि पोलीस विभागाचे कर्मचारी शासनाने नियम पाळण्यासाठी सातत्याने शहरात जनजागृती करीत आहेत. तसेच कोरोनाचे नियम मोडणाऱ्या लोकांवर आणि दुकानदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा देखील उगारला जात आहे. नागरिकांनीही कोरोनाचे नियम पाळत प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातीलही कोरोनाचा संसर्ग हळूहळू का होईना कमी होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, संसर्ग कमी झाला असला तरी शहरातील व्यापारी व नागरीकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पुढील पंधरा दिवस शहरवासीयांनी लॉकडाऊनऊनचे नियम पाळल्यास कोरोना शहरातून हद्दपार होईल, असा विश्वास पालिका आणि पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
चौकट......
मार्च महिन्यात झाला शिरकाव
शहरात मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केला होता. एप्रिल आणि मे च्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढली होती. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील चार दिवसांत शहरात फक्त दोनच रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शुक्रवारी आणि रविवारी या दोन दिवसांत शहरात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग सध्या तरी कमी झाल्याचे दिसून येत आहे.