मुरूम : उमरगा तालुक्यातील मुळज प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या जगदाळवाडीत मागील महिनाभरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता; परंतु शनिवार आणि रविवारी झालेल्या तपासणीत तब्बल १८ रुग्ण आढळले. त्यामुळे प्रशासनासह ग्रामस्थांचीही चिंता वाढली आहे. उमरगा तालुक्यातील आलूर, मुळज, डिग्गी, येणेगूर, नाईचाकूर या पाच प्राथमिक आरोग्यकेंद्रांर्तगत शनिवारी ३४९ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात १९ जण बाधित झाल्याचे आढळून आले, तसेच रविवारी या पाच केंद्रांतर्गत १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी १४ रुग्ण हे मुळज आरोग्यकेंद्रांतर्गत येणाऱ्या जगदाळवाडी गावातील आहेत. शनिवारी याच गावात कोरोनाचे ४ रुग्ण आढळून आले होते. यासंदर्भात मुळज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सुरवसे म्हणाल्या, उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी हे गाव दोन ते अडीच हजार लोकसंख्येचे असून, मागील महिनाभर या गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. मात्र, शनिवारी केलेल्या रॅपिड चाचणीत एकाच वेळी चार बाधित आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावातील १०६ जणांची रविवारी अँटिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये पुन्हा १४ नव्या रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे काहींना सौम्य लक्षणे, तर काही जण कसलीही लक्षणे नसणारे लोकही कोरोनाबाधित झाले आहेत. या सर्वांवर उमरगा येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. गावातील लोक गावातच कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी करीत आहेत.
चौकट...........
पाच केंद्रांत अँटिजन टेस्ट
तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तगत शनिवारी ३४९ आणि रविवारी २९६, अशा एकूण ६४५ कोविड संशयित आणि संपर्कातील लोकांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये तब्बल ३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.