धाराशिव : शेततळ्याचा प्रस्ताव तयार करून तो अनुदान मंजुरीसाठी पाठवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कळंबच्या कृषी अधिकाऱ्याला शनिवारी दुपारी एसीबीने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब कृषी कार्यालयात कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संतोष बाबुराव हुरगट (५०) यांनी एका २२ वर्षीय तरू शेतकऱ्याकडेही लाच मागितली होती. संबंधित तक्रारदारास शेततळे घ्यावयाचे होते. याबाबत त्याने कृषी अधिकारी हुरगट यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक, प्रस्ताव तयार करून अनुदान मंजुरीस पाठवून देण्यासाठी २० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
दरम्यान, संबंधित तरुणाने या लाच प्रकरणाची लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याअनुषंगाने शनिवारी दुपारी कळंब येथे सापळा रचला असता आरोपी संतोष हुरगट हा २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडला. त्यास ताब्यात घेऊन एसीबीने पंचनामा करीत कळंब ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई उपाधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक नानासाहेब कदम, कर्मचारी सचिन शेवाळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, दत्तात्रय करडे सहभागी झाले होते.
२४ तासात झाली कारवाई...तक्रारदार तरुणाकडे लाच मागितल्यानंतर त्याने तातडीने १ डिसेंबर रोजी धाराशिवच्या एसीबी कार्यालयात आपली तक्रार दिली. यानंतर त्याच दिवशी दुपारी एसीबीच्या पथकाने लाच मागणीची पडताळणी करून घेतली. २ डिसेंबर रोजी रक्कम देण्याचे ठरल्यानंतर यादिवशी दुपारी कारवाई करून लाचखोर कृषी अधिकाऱ्यास पकडण्यात आले. अवघ्या २४ तासात ही कारवाई पूर्ण करण्यात आली.