उस्मानाबाद : कृषी केंद्र आणि शेतकरी गटांना उधारीवर खत वाटप करून वसूल केलेले सुमारे २२ लाख २२ हजार ५७८ रूपये कार्यालयाकडे जमा न करता, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्याविरूद्ध २३ आॅगस्ट रोजी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बाबासाहेब रेवणसिद्धप्पा पाटील (रा. उस्मानाबाद) हे २०१० ते २०१४ या कालावधीत उस्मानाबाद येथे जिल्हा मार्केटींग अधिकारी म्हणून कार्यरत होते. याच कालावधीत पाटील यांनी पदाचा दुरूपयोग करून व मार्केटींग फेडरशेनच्या नियमांचे उल्लंघन करून विविध कृषी केंद्र आणि शेतकरी गटांना तब्बल ७४ लाख ९८ हजार ४७५ रूपये किंमतीचे खत उधारीवर वाटप केले. त्यांच्याकडून तब्बल २२ लाख २२ हजार ५७८ रूपये वसूलही केले. ही रक्कम लागलीच जिल्हा मार्केटींग कार्यालयाच्या खात्यावर जमा करणे आवश्यक होते.
परंतु, पाटील यांनी तसेच केले नाही. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी रक्कमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. चौकशीतून ही बाब समोर आल्यानंतर सध्याचे जिल्हा मार्केटींग अधिकारी मनोज वाजपेयी यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली असता पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २३ आॅगस्ट रोजी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात भादंविचे कमल ४०९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.