मोहा : कळंब तालुक्यातील दहिफळ येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर ग्रामसभेचे आयोजन केले होते. यात वृक्ष लागवड, गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, यासह वेगवेगळ्या २३ विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच मागील चार वर्षांपासून रिक्त असलेल्या तंटामुक्त समिती अध्यक्ष पदावर कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षस्थानी सरपंच चरणेश्वर पाटील, तर सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे यांनी कामकाज पाहिले. या ग्रामसभेत गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्वच्छ-सुंदर गाव, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षलागवड योजना, कोविड उपाययोजना, लसीकरण, रमाई आवास योजना प्राधान्य यादी तयार करणे, १५ व्या वित्त आयोगाचा आराखडा २०२१-२२ मंजूर करणे, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर खोलीकरण व बांधकाम करणे, ड्रोन सर्वेक्षण करणे बाबत प्रस्ताव सादर करणे, पहिली ते चौथी वर्ग सुरू करणे, कचरा डेपो व्यवस्थापन जागा निश्चित करणे, आदी २३ विषयांवर चर्चा करून अनेक ठराव मंजूर करण्यात आले.
चौकट...
अतिक्रमणे हटवा; ग्रामस्थांची मागणी
ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान परिसरात अतिक्रमण काढण्याची मागणी काही ग्रामस्थांकडून यावेळी करण्यात आली. यावर विशेष ग्रामसभा बोलावून अतिक्रमण निश्चित करून ते काढण्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करेल, असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे यांनी दिले. विद्यार्थ्यांचे नुकसान पाहता गावातील पहिली ते चौथी वर्ग सुरू करण्यात यावे, असा ठराव शेखर पाटील यांनी मांडला. यावर पालकांची विशेष बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सरपंच पाटील म्हणाले.
300821\0806img-20210830-wa0085.jpg
दहिफळ येथे चार वर्षांनंतर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सत्कार करताना सरपंच चरनेश्वर पाटील ,ग्रामसेवक सत्कार करताना दिसत आहेत