धाराशिव -जिल्हा परिषद शाळांतील निवड झालेले २४ विद्यार्थी साेमवारी सकाळी ‘इस्त्राे टूर’साठी रवाना झाले. जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी मुलांच्या बसला हिरवी झेंडी दाखविली. केंद्र, तालुका तसेच जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या परीक्षेत या विद्यार्थ्यांची टूरसाठी निवड झाली हाेती.
विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा नियाेजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी इस्त्राे अभ्यास दाैर्याचे आयाेजन केले हाेते. त्यानुसार दाैर्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता केंद्र, तालुका आणि जिल्हा अशा तीन स्तरावर परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षेच्या निकालाअंती प्रत्येक तालुक्यातून पहिले तीन या प्रमाणे २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
दरम्यान, तयारी पूर्ण झाल्यानंतर साेमवारी सकाळी संबंधित २४ विद्यार्थी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्यासही जवळपास ३२ जण अभ्यास दाैर्यासाठी रवाना झाले. हे विद्यार्थी विश्वेश्वरय्या म्युझियम, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा येथील राॅकेट लाॅन्चिंग, तिरूअनंतपुरम येथील प्राणी संग्रहालयास भेट देतील. हा अभ्यास दाैरा चार दिवसांचा असेल. १८ मे च्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते धाराशिवमध्ये परततील.