लोहारा : लोहारा तालुक्यातील माकणी येथे लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रासाठी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी २५ बेड दिले आहेत. यामुळे आता येथे ५० बेडची व्यवस्था झाली आहे.
माकणी येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोहारा, तुळजापूर व उस्मानाबाद येथे रुग्णांना पाठविण्यात येत आहे. त्यांना बेड मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन गावचे सरपंच विठ्ठल साठे यांनी आपल्या कल्पनेतून २५ बेडचे आयसोलेशन केंद्र लोकसहभागातून सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांची बैठक घेऊन हा विषय त्यांच्या समोर मांडला. यावेळी गावातील ग्रामस्थांनी याला होकार देऊन सर्वोतपरी मदत केले. आणि २५ बेडचे काेराेना आयसाेलेशन सेंटर सुरू झाले. या केंद्राला आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी आणखी २५ बेड दिले आहेत. त्यामुळे येथे आता ५० बेडचे आयसोलेशन केंद्र सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनी आयसोलेशन केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली, तसेच त्यांनी आयसोलेशन केंद्रास ५० लीटर सॅनिटायझरची मदत केली आहे. गावातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी दिलीप श्रीरंग पवार यांनी १० फेसफिल्ड मास्कची मदत केली. यावेळी सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, दादासाहेब मुळे, ॲड.दादासाहेब जानकर, सुभाष आळंगे, शिवाजी साठे, अच्युत चिकुंद्रे, निकेत पत्रिके, बाळू कांबळे, गोपाळ ढोणे, शुभम साठे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने लोकसहभागातून आयसोलेशन केंद्रामधील रुग्णांना सकाळी नाष्टा व अंड्यांची व्यवस्था केली आहे.