उस्मानाबाद : शासनाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गत तीन वर्षात तब्बल २५०० शेततळी तयार करण्यात आली़ मात्र, या शेततळ्यावरील महत्त्वाचा भाग असलेल्या अस्तरीकरणाचे काम केवळ २३७ शेततळ्यांचे झाले आहे़ अपुरे अनुदान आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे ही कामे अपूर्ण दिसत आहेत़
शेतकयांना सतत दुष्काळाला तोंड द्यावे लागत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत़ पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे़ त्याचा पिकांवर परिणाम होत आहे़ शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच नैसर्गिक दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे योजना राबविली आहे़ प्रत्येक शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत शेततळे योजनेचा लाभ देण्यात येतो़ परंतु कागदाची जुळवाजुळव, अटी, नियमांनमुळे अनेक शेतकरी हैराण होतात़ त्यातच शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे ५० हजार व प्लास्टिक अस्तरीकरण ७५ हजार असे मिळून १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत मागेल त्याला शेततळे देण्याची योजना आहे़
राष्ट्रीय कृषी विकास योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या अंतर्गत शेतकºयांना वयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना दिली होती़ मात्र आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर अनेक शेतक-यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. परंतु या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे़ गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ३७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी अद्यापर्यंत २ हजार ५२० शेततळी पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे़ त्या शेततळ्यापैकी वैयक्तिक शेततळ्यामध्ये आजवर केवळ २३७ शेतकऱ्यांनीच अस्तरीकरण केल्याचे समोर आले आहे.