गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील लहान, मोठे व मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांत पाणीसाठा वाढला होता.
जिल्ह्यात मोठा १, मध्यम १८, लघु २०८ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील पाण्यावरच सिंचन तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. मागील दोन-तीन वर्षे जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे प्रकल्प पूर्णक्षमतेने भरले नव्हते. ज्या प्रकल्पात पाणी उपलब्ध होते, तेही प्रकल्प फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरडे पडत असत. त्यामुळे पशूंच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत असे. शिवाय पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना भटकंती करावी लागत असे. गतवर्षीही मार्च महिन्यात अनेक प्रकल्प कोरडे पडले होते. त्यामुळे काही भागात अधिग्रहणे तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. मात्र, यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यानंतर अधून-मधून सतत पाऊस पडत राहिला. काही भागात अतिवृष्टीही झाली. सततच्या पावसामुळे प्रकल्पांत पाण्याची आवक होत राहिल्याने मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा १४५ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले. २४ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध होता. मुबलक पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामात उत्पादनातही वाढ झाली आहे. पशूंच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. सध्या २२८ प्रकल्पांपैकी २ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा आहे. ७९ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. ९४ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. या एकूण प्रकल्पांत १९५.२७ दलघमी पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी २६.८६ टक्के इतकी आहे. सध्या पाण्याची मागणी व बाष्पीभवानाचा प्रकार पाहता उपलब्ध २६ टक्के जलसाठा अजून दोन महिने वापरावयाचा आहे.
चौकट...
जिल्ह्यातील धरणाची साठवण क्षमता ७२७.०५२ दलघमी इतकी असून, त्यात आता फक्त १९५.२७ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणातील २६ टक्के पाणी शिल्लक आहे. २ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के पाणी आहे. ७९ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांदरम्यान, तर ९४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. मार्च महिन्यापासून जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने वाढले आहे.
टँकर, अधिग्रहण नाही
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. त्यामुळे प्रशासनाकडून या गावांतील नागरिकांना अधिग्रहणे तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. गतवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यांत अधिग्रहणे तसेच टँकर सुरू होते. यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टँकर व अधिग्रहण करण्यात आलेले नाही.