उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने खाली येत आहे. रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता गावेही झपाट्याने कोरोनामुक्त होत आहेत. मागील दहा दिवसांमध्ये तब्बल २८ गावे पूर्णत: कोरोनामुक्त झाली आहेत. १०पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या रेड झोनमधील गावांची संख्याही या कालावधीत चांगलीच घटली आहे.
एप्रिल महिन्यापासून कोरोना संसर्गाचा जिल्ह्यात उद्रेक झाला होता. पाहता पाहता रुग्णसंख्येने ५० हजारी टप्पाही या काळातच ओलांडला. शहरी भागात थैमान घातलेल्या कोरोनाने मे महिन्यात मात्र ग्रामीण भागात आपले पाय पसरले. जिल्ह्यातील एकूण ७४६ पैकी ४६९ गावांमध्ये कोरोनाने २० मेपर्यंत शिरकाव केलेला होता. हा प्रसार म्हणजे धोक्याची घंटा ठरत होती. परिणामी, प्रशासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाचा तिसरा टप्पा गतीने राबविला. यामधून कोमॉर्बिड रुग्णांचा शोध घेतला गेला. नागरिकांनीही प्रामाणिकपणे व्याधींची खरी माहिती दिली व उत्स्फूर्तपणे चाचण्या करण्यास प्रतिसाद दिला. यामुळे लवकर निदान होऊन वेळेत उपचार मिळत गेल्याने ग्रामीण भागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगलेच वाढीस लागले आहे. यातूनच अनेक गावांनी कोरोनास पिटाळून लावण्यात यश मिळविले आहे. २० ते ३१ मे या कालावधीत २८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. २० मे रोजीपर्यंत एकही कोरोना रुग्ण नसलेल्या गावांची संख्या २७७ इतकी होती. त्यात वाढ होऊन ३१ मे रोजी ही संख्या ३०५ इतकी झाली आहे. म्हणजेच आजघडीला जवळपास ४० टक्केपेक्षा जास्त गावांनी कोरोनाचा शिरकाव रोखल्याचे दिसते.
रेड झोनमध्ये ७२ गावे...
१. १० पेक्षा जास्त कोरोनाबाधित असलेल्या गावांना रेड झोन यादीत समाविष्ट केले जात आहे. या ठिकाणी कोरोनास रोखण्यासाठी प्रशासनाकडून जास्तीचे प्रयत्न केले जात आहे. त्याचे फलितही दिसून येत आहे.
२. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १० पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावांची संख्या १५२ इतकी होती. महिनाअखेरीस ही संख्या जवळपास निम्म्याने कमी होऊन ७२ वर पोहोचली आहे.
३. यातही सर्वाधिक १४ गावे ही वाशी तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ उस्मानाबाद १३, तुळजापूर व लोहारा तालुक्यातील प्रत्येकी ११ गावे रेड झोनमध्ये आहेत.
४. सर्वात कमी ४ गावे कळंब तालुक्यातील आहेत. भूम ७ तर उमरगा व परंडा तालुक्यातील प्रत्येकी ६ गावे या यादीत आहेत.
२६१ गावांत कमी रुग्णसंख्या...
पाचपेक्षाही कमी रुग्णसंख्या असलेल्या गावांची संख्या आता २६१वर येऊन पोहोचली आहे. २० मे पर्यंत ही संख्या २९७ इतकी होती. दरम्यान, ५ ते ९ रुग्णसंख्या असलेल्या गावांची संख्या सध्या १०८ इतकी आहे. मे महिन्याच्या सुरुवातीस ही संख्या १६० इतकी होती.