उस्मानाबाद - काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे. असे असतानाही विनामास्क वावरणार्या २९ जणांविरूद्ध पाेलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. दंडापाेटी त्यांच्याकडून सुमारे १४ हजार ५०० रूपये वसूल करण्यात आले आहे. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे १५ जणांना दंड केला.
जुगार अड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल
उस्मानाबाद - उमरगा येथील महावितरण कार्यालयाच्या समाेरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी छापा मारला. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह चार स्मार्टफाेन व राेख रक्कम मिळून २४ हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २५ फेब्रुवारी राेजी करण्यात आली.
फरार आराेपीस ठाेकल्या बेड्या
उस्मानाबाद - कळंब पाेलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा नाेंद असलेले रामा दगडू गरगेवाड (रा. लातूर) हेमागील चार वर्षांपासून फरार हाेते. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मूळ गावातून अटक करण्यात आली. ही कारवाई २६ फेब्रुवारी राेजी केली. पुढील कारवाईस्तव गरगेवाड यास कळंब ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण
उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका १६ वर्षीय मुलगी आपल्या आजाेळी असताना गावातीलच एका युवकाने तिचे २२ फेब्रुवारी राेजी अपहरण केले. या प्रकरणी मुलीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित युवकाविरूद्ध भादंसंचे कलम ३६३, ३६६ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
भाेगजी येथे घरफाेडी
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील भाेगजी येथील बालाजी रंगनाथ खराटे हे बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञाताने घर फाेडले. चाेरट्यांनी घरातील साेन्या-चांदीचे दागिने, टीव्ही व राेख रक्कम मिळून सुमारे ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी खराटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूद्ध कळंब ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकच्या धडकेत दाेन गायी ठार
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील हासेगाव येथील फुलचंद केरबा राऊत यांच्या दाेन गायींना भरधाव ट्रकने जाेराची धडक दिली. २५ फेब्रुवारी राेजी घडलेल्या या घटनेत राऊत यांच्या दाेन्ही गायींचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिराढाेण पाेलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालाकविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.