उस्मानाबाद : नववी ते बारावी दरम्यानच्या शाळा सुरळीत झाल्यानंतर आता पाचवी ते आठवी दरम्यानच्या शाळा २७ जानेवारीपासून भरणार आहेत. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या तब्बल ३ हजार ७८९ शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे. शनिवारअखेर सुमारे ४२४ जणांची चाचणी झाली आहे.
राज्यभरात काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर खबरदारीचा भाग म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. परंतु, मागील काही महिन्यांपासून काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने नववी ते बारावी दरम्यानचे वर्ग सुरू केले. या वर्गांतील उपस्थिती दिवसागणिक वाढू लागली आहे. हे वर्ग सुरळीत हाेताच आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबात आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आवश्यक त्या उपाययाेजना सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पाचवी ते आठवीच्या वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे. सध्या या चाचण्या सुरूही झाल्या आहेत. शनिवारअखेर ३ हजार ७८९ पैकी ४२४ जणांची चाचणी झाली आहे. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्याही सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुकास्तरावरील सेंटरमध्ये या चाचण्या करण्यात येत आहेत. साेबतच त्या-त्या शाळांतील वर्गखाेल्या सॅनिटाइज करण्यासाेबतच पालकांकडून लेखी संमतीपत्रही घेतले जात आहे. यासाेबतच अन्य उपायाेजनाही करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डाॅ. अरविंद माेहरे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.
चाैकट...
जिल्हास्तरावर कार्यशाळा...
राज्य सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे. तीन-चार दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख तसेच विस्तार अधिकारी यांची एकत्रित कार्यशाळा घेण्यात आली. ज्ञानदान करणाऱ्या गुरुजींची काेराेना टेस्ट करून घेणे, वर्गखाेल्या सॅनिटाइज करणे, विद्यार्थ्यांतील तापमान तपासणी आदी बाबींची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेस जि. प. अध्यक्ष अस्मिता कांबळे, सीईओ डाॅ. विजयकुमार फड आदींची उपस्थिती हाेती.
काेट...
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश येताच उपायाेजना सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या संबंधित वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येत आहे.
-डाॅ. अरविंद माेहरे,
शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद