उमरगा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांचा शोध, त्यासाठी लागणारी कागदपत्रे,जात वैधता प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची जमवाजमव करून ऑनलाईन प्रक्रियेतून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठीची धावपळ सुरू आहे. बिनविरोध ग्रामपंचायतीसाठीही सदरील प्रक्रिया करावी लागणार आहे. परंतु, एकोप्याचा संदेश आणि निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवरचे वाद टाळण्यासाठी बिनविरोधचा पर्याय चांगला आहे. कुन्हाळी गटातील कुन्हाळी, गुगळगाव, कदमापूर-दुधनाळ, हंद्राळ, कराळी, तलमोड, जगदाळवाडी, थोरलेवाडी, हिप्परगाराव, कोळसूर (गुंजोटी), कोळसूर (कल्याण), चिंचकोटा या १२ ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषदेच्या विविध विकास योजनेतून ३० लाखांचा निधी बिनविरोध येणाऱ्या ग्रामपंचायतीला देण्यात येणार असल्याचे प्रकाश आष्टे यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, अनिल पाटील, दत्ता चिंचोळे आदी उपस्थित होते.
‘बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी देणार ३० लाखांचा निधी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:24 AM