उस्मानाबाद : आजार अंगावर काढणे, वेळेत उपचार न घेणे म्हणजे जिवाशी खेळणेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचे स्वरूप गंभीर झाल्यावर दवाखाना गाठणे सुरूच असल्यामुळे व्हेंटिलेटर बेड कायम फुल्ल आहेत. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असल्याने ऑक्सिजन, आयसीयू बेड रिकामे होत असताना दुसरीकडे व्हेंटिलेटर बेडसाठी मात्र वेटिंग कायम आहे. मंगळवारी जिल्ह्यात केवळ ३ व्हेंटिलेटर बेड रिकामे होते.
कोरोनाची दुसरी लाट क्षीण होत चालली आहे. मात्र, यामुळे बेफिकीर वर्तन करणे हे अंगलट येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सरासरी केवळ सव्वा दोनशेच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. पॉझिटिव्हीटी रेटही मोठ्या प्रमाणात खाली आला आहे. या सकारात्मक बाबी असल्या तरी मृत्यूचे प्रमाण अजूनही चिंताजनक आहे. मे महिन्यात दररोज सरासरी १० प्रमाणे ३०० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद पाेर्टलला घेण्यात आली आहे. अगदी शेवटच्या आठवड्यातच हे प्रमाण प्रतिदिन साडेसहा मृत्यूवर आले आहे. मृत्यू प्रमाणातही काही अंशी घट दिसून येत आहे. मात्र, ज्या प्रमाणात रुग्ण कमी झाले, त्या तुलनेत हा आकडा नक्कीच बरा नाही. आजार अंगावर काढून अतित्रास सुरू झाल्यानंतरच दवाखाना गाठण्यामुळेही मृत्यू जास्तीचे घडून येत आहेत. आजघडीला उपचारातील शेवटचा टप्पा म्हणजे रुग्ण व्हेंटिलेटरवर जाणे. ज्या प्रमाणात इतर बेड रिकामे होत आहेत, त्या प्रमाणात व्हेंटिलेटर बेड रिकामे होताना दिसत नाहीत. यामुळेच मृत्यू कमी होईनासे झाले आहेत.
दोन दिवसांपासून तीनच बेड शिल्लक...
रुग्णसंख्या झपाट्याने खाली आली असल्याने ऑक्सिजन, आयसीयू व नॉर्मल बेड मोठ्या प्रमाणात रिकामे झाले आहेत. मात्र, जिल्हाभरात उपलब्ध असलेल्या एकूण १४३ व्हेंटिलेटर बेडपैकी गेल्या दोन दिवसांपासून केवळ ३ बेडच रिकामे होते. ९६५ ऑक्सिजन बेडपैकी मंगळवारी ४०१ तर २६३ आयसीयू बेडपैकी ८७ रिकामे होते. ही परिस्थिती लक्षात घेता वेळेत उपचारासाठी दवाखाना गाठल्यास किमान ऑक्सिजन, आयसीयू बेड तरी मिळू शकतील. त्या पुढच्या पातळीवर गेल्यास मात्र अडचणी निर्माण होऊ शकतील.
बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक...
मे महिन्यात नव्याने बाधित आढळलेल्या रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. एकूण महिनाभरात १५ हजार ९३२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तुलनेत याच महिन्यात १९ हजार ७५१ रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्या महिनाअखेरीस ७ हजारांहून ३ हजारांवर आली आहे. दरम्यान, १ मे रोजीपर्यंत जिल्ह्यात ९४१ मृत्यूची नोंद झाली होती. त्यात ३०० ने वाढ होऊन अखेरीस ही संख्या १,२४१ इतकी झाली आहे.