कळंब : सिमेंट बंधारा व कोल्हापूर पद्धतीचा बंधारा यात समन्वय साधत, द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्याचे ‘मॉडेल’ तयार करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने कळंब तालुक्यातील १७ गावांत असे ३१ ‘गेटेड चेक डॅम’ बांधण्यात येणार आहेत. यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील शेती क्षेत्राला सिंचनाचे बळ देण्यासाठी जलसंधारणाची कामे करून भूगर्भातील पाणी पातळीत कशी वाढ होईल, याकडे लक्ष देण्याबरोबरच पाणी अडवून त्यातून चांगली जलसाठवण क्षमता स्थापित करणे गरजेचे आहे. यातूनच अनिश्चित पर्जन्यमान असलेल्या या भागाला आधार मिळणार आहे. याचाच विचार करत, मागच्या अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध विभागांमार्फत विविध जलसाठवण स्रोत निर्माण करण्यात आलेली आहेत. यापैकीच सिमेंट बंधारे व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची गावोगावी निर्मिती करण्यात आली आहे.
राज्यात पथदर्शी ठरलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची सध्या दुरवस्था झाल्याने व पाणी अडविण्यासाठी दरवाजेच उपलब्ध नसल्याने, ‘आलं पाणी, गेलं पाणी’ अशी अवस्था झाली आहे. एकूणच दुरुस्तीसाठी निधी नसल्याने, हाताळण्यास सहज नसणाऱ्या, संवर्धन कोणी करायचे, असा प्रश्न पडलेल्या या बंधाऱ्याचा शेती क्षेत्रासाठी उपयोग होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वाहणाऱ्या नद्यांवर पावसाळ्यातील पाणी अडवणारी, साठवणारी एखादी पर्यायी योजना राबवावी, अशी मागणी होत होती. यातूनच तालुक्यात मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हा जलसंधारण कार्यालयाच्या कळंब येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाने केलेल्या सर्वेक्षणातून द्वारयुक्त सिमेंट नाला बंधारे बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यास मागच्या काही दिवसांत मंजुरी मिळाली असून, संब़ंधित विभागाने याची नुकतीच ऑनलाइन ई-निविदा प्रक्रिया राबविली आहे.
आठ कोटींचा निधी
कळंब तालुक्यात जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाच्या कळंब येथील उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या १७ गावांत ३१ गेटेड चेक डॅम बांधण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास आठ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यामध्ये नायगाव व ईटकूर येथे प्रत्येकी चार तर खामसवाडी येथे तीन बंधारे होणार आहेत. याशिवाय भाटसांगवी, भाटशिरपुरा, देवधानोरा, मंगरूळ, मोहा, वाठवडा येथे दोन, तर आथर्डी, बोरगाव धनेश्वरी, बोरवंटी, खडकी, सात्रा, शेळका धानोरा, वाकडी, सौंदना ढोकी येथे प्रत्येकी एक बंधारा होणार आहे, असे या विभागाचे अभियंता काकडे यांनी सांगितले.
असे आहे स्वरूप
सध्या अस्तित्वात असलेल्या कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व सिमेंट नाला बंधारा यांच्यात समन्वय साधत, ‘गेटेड चेक डॅम’ या बंधाऱ्याचे ‘मॉडेल’ ठरविण्यात आले आहे. को.प.ला दरवाजे असतात, तर सिमेंट बंधाऱ्याला दरवाजे नसतात, पण पाणी अडवणारी भिंत असते. गेटेड बंधारा मात्र खाली सिमेंट बंधाऱ्यासारखा, तर वर कोल्हापुरी बंधाऱ्यासारखा असणार आहे. यात पहिल्या राबविलेल्या दोन्ही बंधाऱ्यांचा समन्वय साधण्यात आला आहे. कमीतकमी दीड ते दोन मीटर उंच तर १० ते ३३ मीटर रुंद असे हे बंधारे आहेत. यात पावसाळ्यात हवे तेव्हा ‘इझिली ऑपरेट’ करून पाणी अडवण्यासाठी कमी उंचीचे लोखंडी गेट राहणार आहेत. वरच्या बाजूला स्लॅब राहणार नाही.
शेती क्षेत्राला होणार फायदा
या गेटेड चेक डॅम बंधाऱ्यामुळे लगतचे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पाण्याचा येवा व रुंदी लक्षात घेत, या गेटेड अर्थात द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्यांची उंची, खोली, दारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येकी किमान दहा ते कमाल शंभर हेक्टर क्षेत्र यामुळे सिंचनाखाली येणार आहे. या कामी स्थानिक लोकप्रतिनिधींही पुढाकार घेतला होता.