येडशी -विद्युत महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे येडशी, उपळा व खेड सबस्टेशनअंतर्गतच्या २० ते २५ गावांतील वीजपुरवठा तब्बल ३२ तास बंद हाेता. त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांसाेबतच व्यापाऱ्यांनाही गैरसाेयीला ताेंड द्यावे लागले. पशुधनाचेही प्रचंड हाल झाले.
उस्मानाबादहून येडशीकडे जाणारी ३३ केव्हीए लाईन औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना अंडरग्राऊंड केबल टाकून जोडण्यात आली होती. परंतु, या ठिकाणी सतत केबल व किट जळत आहे. त्यामुळे किट वा केबल जळाले की दिवस-दिवस वीजपुरवठा खंडित राहताे. उस्मानाबादहून वीजपुरवठा खंडित झाल्यास येरमाळा येथून वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, हाही वीजपुरवठा सतत खंडित होतो. दरम्यान, उस्मानाबाद येथून येडशीसाठी नवीन वीजपुरवठा लाईन टाकण्याचे काम मागील पाच ते सात वर्षांपासून सुरू आहे. हे काम गडपाटीपर्यंत पूर्ण झाले आहे. यापुढे मात्र ते सरकत नाही. काही शेतकऱ्यांनी हे काम अडविल्याने संबंधित कंत्राटदाराने काम केले नाही. त्यामुळे आजवर पर्यायी लाईन सुरू हाेऊ शकली नाही. येडशी ते इढोकी ही पर्यायी लाईन टाकण्यात आलेली आहे. परंतु, आजघडीला ती बंद आहे.
परिणामी ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. ३० ऑगस्टला सकाळी साडेनऊ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर ३१ राेजी दुपारी १ ते सायंकाळी ७.५० तर १ सप्टेंबरला सकाळी ११.२० वाजता वीजपुरवठा खंडित झाला हाेता. ताे सायंकाळपर्यंत सुरू झालेला नाही. म्हणजेच जवळपास ३२ तासांपेक्षा जास्त वीजपुरवठा खंडित राहिला. परिणामी पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेकाना अंघोळीला पाणी मिळाले नाही. बँका, डाक कार्यालय, एटीएम सेवाही विजेअभावी बंद राहिली. माेबाईलही चार्ज झाले नाहीत. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासावरही परिणाम झाला.
चाैकट...
मेणबत्ती लावून केली डिलिव्हरी
येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्री प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते परंतु, वीज नसल्याने उजेडाचे करायचे काय? असा सवाल डाॅक्टर, कर्मचाऱ्यांसमाेर हाेता. दुसरा काेणताही पर्याय नसल्याने मेणबत्तीच्या प्रकाशात प्रसूती करण्यात आली.
व्यापाऱ्यांचेही नुकसान
वीजपुरवठा खंडित राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. येथील हाॅटेल व्यवसाय माेठा आहे. अशा हाॅटेलमधील दूध, आईस्क्रिम, पनीर, केक आदी पदार्थ वाया गेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित हाेण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजाभाऊ धावणे यांनी केली.