बियाण्यांचा ठणठणाट - ‘कृषी’कडून ६३ मेट्रिक टन खताची नाेंदविली मागणी
उस्मानाबाद : काेराेनाने थैमान घातले असले तरी कृषी विभागाकडून आगामी खरीप हंगामाची जाेरदार तयारी करण्यात येत आहे. ‘कृषी’ने मागील पाच वर्षांतील खतांचा सरासरी वापर लक्षात घेऊन सुमारे ६३ मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे. यापैकी आजघडीला ३० हजार मे. टन खत जिल्ह्यात दाखल झाले आहे. उर्वरित आवंठणही पंधरा ते वीस दिवसांत मिळेल, असा दावा यंत्रणेने केला आहे.
जिल्ह्यावरील काेराेनाचे संकट गडद झालेले आहे. अशाही परिस्थतीत जिल्हा परिषद कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पेरणीचे नियाेजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात ५ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी हाेईल, असा कृषीचा अंदाज आहे. त्यानुसार खत, बियाण्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. मागील पाच वर्षांतील खतांचा सरासरी वापर लक्षात घेऊन ६३ हजार मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आजअखेर ३० हजार २४८ मे. टन खत जिल्ह्यात दाखल झाले आहे. यात डीएपी १९ हजार ७२० मेट्रिक टन मागणी केले असता, ५ हजार ३०६ मे. टन उपलब्ध झाले आहे. माेओपी २ हजार ११० पैकी १ हजार ६७८ मे. टन, एसएसपी ४ हजार ६७० पैकी ३ हजार ५५७, तर एनपीके १९ हजार ३७० पैकी १४ हजार ३७७ मेट्रिक टन दाखल झाले आहे. बियाण्यांच्या बाबतीत मात्र वेगळे चित्र आहे. महाबीजकडून ५१ हजार ७५० क्विंटल, एनएससीकडून ५ हजार क्विंटल, तर खासगी कंपन्यांकडून ३७ हजार ९७४ क्विंटल बियाण्यांची मागणी नाेंदविली आहे. यापैकी महाबीज आणि एनएससीकडून किलाेभरही बियाणे मिळालेले नाही. मात्र, खासगी कंपन्यांकडून ३०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. येत्या महिनाभरात खत तसेच बियाणेही मागणीनुसार उपलब्ध हाेईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
चाैकट...
यंदा दर वाढण्याची शक्यता?
खत उत्पादक कंपन्यांनी यंदा खतांच्या दरामध्ये माेठी वाढ केली आहे. असे असतानाच आता काही बियाणे उत्पादक कंपन्यांकडूनही खताच्या दामध्ये वाढ केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काेणत्या कंपन्यांनी नेमकी किती वाढ केली हे येत्या काही दिवसांत स्पष्ट हाेणार आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामाची पेरणी शेतकऱ्यांसाठी खर्चिक ठरणार आहे.
काेट...
मागील पाच वर्षांतील खत तसेच बियाण्यांचा सरासरी वापर लक्षात घेऊन शासनाकडे मागणी नाेंदविली हाेती. त्यानुसार आजघडीला आपणाला मागणीच्या ५० टक्के खत उपलब्ध झाले आहे. उर्वरित आवंठणही लवकरच मिळेल. बियाणेही चार-आठ दिवसांत मिळण्यास सुरुवात हाेईल. कुठल्याही परिस्थितीत यंदा खत, बियाण्यांचा तुटवडा निर्माण हाेणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे.
डाॅ. टी. जी. चिमनशेट्टे, जिल्हा कृषी विकास अधिकारी.