उस्मानाबाद : नाशिक जिल्ह्यात पकडलेल्या मांडुळास ग्राहक शोधत उस्मानाबाद गाठलेल्या सहा तस्करांना गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले मांडूळ हे तब्बल साडेतीन किलो वजनाचे असून, त्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नाशिक येथील रहिवासी असलेले आरोपी दीपक एकनाथ शिंदे, विजय देवराम कटारनवरे, संदीप बाळासाहेब लोखंडे या चौघांच्या हाती दोन तोंडी मांडूळ लागला होता. या मांडुळास मोठी मागणी असल्याने ते गुप्तपणे यासाठी ग्राह शोधत होते. तीन दिवसांपूर्वी ग्राहक शोधत ते उस्मानाबादला आले होते. येथे त्यांच्या संपर्कात असलेल्या अब्दुल आझम पटेल (रा.परंडा, जि.उसमानाबाद) व रामा भीमा कांबळे (रा.बेगडा, ता.उस्मानाबाद) यांच्या मदतीने उस्मानाबादेत त्यांनी ग्राहकाचा शोध सुरु केला. बडा ग्राहक शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु असतानाही ही खबर गुन्हे शाखेला लागली.
मांडूळ असल्याची पक्की खात्री केल्यानंतर पोलीस अधीक्षक नीवा जैन यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे यांनी सहायक निरीक्षक निलंगेकर, उपनिरीक्षक पांडुरंग माने तसेच कर्मचारी जगदाहे, चव्हाण, ढगारे, ठाकूर, कोळी, अरब यांचे पथक तयार करुन शुक्रवारी रात्री सर्व सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर आरोपींनी मांडूळ पोलिसांच्या ताब्यात दिला. त्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये इतकी आहे. याशिवाय, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली ७ लाख रुपये किंमतीची कारही जप्त करुन आनंदनगर ठाण्यात वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - ‘यूपीएससी’त मराठवाडा चमकला; लातूर ५, नांदेड आणि बीडचे ३ तर हिंगोलीचा एकजण यशस्वी
पहिलीच कारवाई...मांडूळ तस्करीची घटना उस्मानाबादेत पहिल्यांदाच समोर आली आहे. गुन्हे शाखेने या मांडुळाचे वजन केले असता तो साडेतीन किलोचा निघाला. तस्करांच्या लेखी त्याची किंमत ४० लाख रुपये इतकी आहे. हा मांडूळ गुन्हे शाखेने वनविभागाच्या हवाली केला असून, त्यास सुरक्षित स्थळी सोडून देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी दिली.
मांडूळ अंधश्रद्धेचा शिकार...शरिराच्या दोन्ही बाजूने तोंड असलेला मांडूळ हा अंधश्रद्धेचा शिकार ठरलेला आहे. गुप्तधन, धनलाभ, आर्थिक समृद्धी या प्रमुख कारणास्तव त्याची तस्करी केली जाते. मात्र, या सर्व अंधश्रद्धा आहेत. तरीही अमेरिकन, युरोपीय राष्ट्रातही त्याला मोठी मागणी आहे. परदेशात याची किंमत आणखी मोठी मिळते, अशी माहितीही गजानन घाडगे यांनी दिली.
हेही वाचा - कार दुभाजकाला धडकली, शिव अंगणवाडी सेनेच्या मराठवाडा अध्यक्षासह अन्य एक ठार