धाराशिव : नवीन मोटार वाहतूक कायद्यातील शिक्षेच्या तरतुदीस विरोध करीत मंगळवारी शहरातील विविध वाहतूक संघटना रस्त्यावर उतरल्या. चालक तसेच मोटार मालकांनी मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या भावना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या. जिल्हा मोटार मालक संघ, विद्यार्थी वाहतूक संघटना, चालक तसेच इतरही वाहतूक संघटनांनी मंगळवारी सकाळी ख्वाजानगर भागातील मुख्य रस्त्यावरून मोर्चाला सुरुवात केली.
जोरदार घोषणा देत हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी नव्या शिक्षेच्या तरतुदीमुळे होणारे हाल चालकांनी विशद केले. सात ते आठ हजार पगारावर काम करणाऱ्या चालकांनी सात लाख रुपयांचा दंड द्यायचा कोठून, अशी भावना एका चालकाने मांडली. तसेच अपघात कोणी जाणीवपूर्वक घडवून आणत नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या शिक्षेची गरज नाही. अपघातानंतर घटनास्थळी मदतीसाठी जरी थांबलो तरी जमावाकडून जबर मारहाण होते. तेव्हा चालकांनी कोणाकडे दाद मागायची, असा सवालही करण्यात आला.
...तर हे आंदोलन थांबणार नाहीचालक हा त्याच्या कर्तव्यावर दीर्घकाळ रोडवर असतो. कुटुंबापासून तो दूर राहतो. अल्प उत्पन्नात त्याला आपला संसार चालवायचा असतो. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलताना चुकून एखादा अपघात झालाच तर १० वर्षे तुरुंगात घालवायची. या काळात त्यांच्या कुटुंबाचे काय हाल होतील, तुरुंगवास भोगून बाहेर आल्यानंतर त्याला काम कसे मिळणार, चालक एकटा नव्हे तर संपूर्ण कुटुंब या शिक्षेमुळे उद्ध्वस्त होईल. हा काळा कायदा असून, तो आम्हाला मंजूर नाही. शिक्षेची ही तरतूद मागे घेईपर्यंत आंदोलन थांबणार नाही. यापुढे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असे उपस्थित चालकांनी सांगितले.