कळंब (जि. उस्मानाबाद) : तुमच्याकडील क्रेडिट कार्ड तुमचेच आहे का, याची खात्री करावी लागेल व यासाठी कार्डचे शेवटचे चार क्रमांक सांगा, अशी एक तरुणी मोबाईलवर बोलली. यावर विश्वास ठेवत चार अंक सांगताच दोन मिनिटांत ७० हजार रुपये बँक खात्यावरून गायब झाल्याचा प्रकार पानगाव येथील एका तरुणाच्या नशिबी आला. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पानगाव येथील अनिल गंगाधर चौधरी हे कळंब येथे फायनान्स कंपनीत एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीला आहेत. गुरुवारी दुपारी त्यांना अनोळखी नंबरवरून एका तरुणीचा कॉल आला. तुमच्या क्रेडिट कार्डला इन्शुरन्स आहे. त्यासाठी १२० रुपये प्रतिमहिना भरावा लागत होता. तो आता ७५० रुपये भरावा लागेल,’ असे सांगितले.यावर चौधरी यांनी मला हा इन्शुरन्स नको, असे प्रत्युत्तर दिले. मग इन्शुरन्स बंद करण्यासाठी आपल्या क्रेडीट कार्डचे शेवटचे चार अंक सांगा, असे तरुणीने सांगितले. त्यानुसार चौधरी यांनी क्रेडिट कार्डचे शेवटचे चार अंक सांगितले. दोन टप्यांत गेले पैसेअंक सांगताच काही क्षणातच त्यांच्या खात्यातून ५० हजार २२५ रुपये वजा झाल्याचा संदेश आला. या धक्क्यातून सावरतात न् सावरतात तोच दोन मिनिटांनी आणखी २० हजार ५०० रुपये काढल्याचा संदेश आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.
कार्डवरील चार आकडे सांगितले; बँक खात्यातून ७० हजार गायब झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 3:03 AM