जावेद इनामदार
मुरूम : कोरोनामुळे अनेक बाजार समित्यांची आवक मंदावली आहे. आर्थिक उलाढालही ठप्प आहे. असे असताना उमरगा तालुक्यातील मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र कोरोनाच्या काळात केलेले योग्य नियोजन, शेतमालाला मिळालेला योग्य भाव, यामुळे २०२० ते २०२१ या चालू वर्षात १ लाख ४८ हजार ४१४ क्विंटल शेतमालाची आवक होऊन ७२ कोटी ८५ लाख ७६ हजार ६८२ रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ३० कोटी ७१ लाख चार हजार १२४ रुपयांनी बाजार समितीची उलाढाल वाढली आहे.
मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जिल्ह्यातील क्रमांक दोनची बाजार समिती म्हणून पाहिले जाते. या बाजार समितीत उमरगा, लोहारा, तुळजापूर, अक्कलकोट या शेजारील तालुक्यातील शेकडो गावासह कर्नाटकातील आळंद तालुक्यातील अनेक गावातील शेतमाल विक्रीसाठी येत असतो. त्यामुळे मुरूम बाजार समितीत प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. २०१९ ते २०२० या वर्षात ९५ हजार ३२६ क्विंटल धान्याची आवक होऊन ४२ कोटी ७८ लाख ६२ हजार ५५८ रुपयांची उलाढाल झाली होती. चालू हंगामात बाजार समितीमध्ये ५० हजार ८८ क्विंटलने आवक वाढली. २०२१ या वर्षात एक लाख ४८ हजार ४१४ क्विंटल आवक होऊन तब्बल ७२ कोटी ८५ लाख ७६ हजार ६८२ रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
सन २०१९ ते २०२० या काळात मुरूम बाजार समितीत १६ हजार ९८८ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली, तर तूर १८ हजार ९६४, उडीद १८ हजार ८०४, सोयाबीन ३४ हजार १७१, तर मूग पाच हजार ८०८ क्विंटलची आवक झाली होती. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटून आर्थिक नुकसान झाले होते. २०२० ते २०२१ या हंगामात मुरुम बाजार समितीत सर्वच शेतमालाची आवक मागील वर्षीच्या तुलनेत ५० हजार ८८ क्विंटलने वाढली असल्याचे दिसून आले. हरभरा २९ हजार ४१४, तूर ३९ हजार ४२०, सोयाबीन ४२ हजार २०२, उडीद २७ हजार ३५२, तर मूग ८ हजार ८३५ क्विंटलची आवक झाली. त्यामुळे कोरोनाच्या काळातही चांगली आवक होऊन बाजार समितीत ७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली.
कोट........
यंदा कोरोनामुळे अनेक बाजार समित्या संकटात आहेत. मुरुम परिसरात कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात सुरू झाली. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, सोयाबीन, तूर, मूग याची खरेदी विक्री बाजारात वेळेवर झाली. शेतमालालाही यावर्षी चांगला दर मिळाला. त्यामुळे बाजार समितीची उलाढाल मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३० कोटी ७१ लाखांनी वाढली आहे. आम्ही बाजार समितीकडून सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याने व पारदर्शक व्यवहार होत असल्याने बाजारात आवक वाढली आहे.
- बापूराव पाटील, मुरूम बाजार समिती