उस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब येथून एका अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्यास भीक मागण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस उस्मानाबादच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी ८ वर्षांची सक्तमजुरी सुनावली. शिवाय ८ हजार रुपये दंडही सुनावला आहे.
अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. आशिष कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी महादेव जनार्धन टिंगरे (रा. लिमटेक ता. बारामती, जि. पुणे) हा सायकल कसरतीचे खेळ गावोगावी करून आपला उदरनिर्वाह करीत होता. या कसरतीच्या खेळामधून जास्तीचे पैसे मिळावे, या उद्देशाने आरोपी हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे आला असता त्याने येथील अशोक रामचंद्र शेळके यांच्या अल्पवयीन मुलाचे चोंदे गल्ली येथून १२ नोव्हेंबर २०१९ रोजी अपहरण केले. त्यानंतर आरोपीने त्या मुलास घेऊन गाव गाठले. या मुलास सायकलच्या कसरतीचे प्रशिक्षण देऊन त्याच्याकरवी गावोगावी पुन्हा खेळ सुरू केले. जीवघेण्या कसरती करावयास लावून या मुलाला लोकांकडून पैसे व भाकरीची भीक मागायला त्याने प्रवृत्त केले.
दरम्यान, कळंब ठाण्यात याप्रकरणी अशोक शेळके यांच्या तक्रारीवरून १३ नोव्हेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक तानाजी दराडे व सहाय्यक निरीक्षक ए. डी. पवार यांनी केला. पोलिस विभागाच्यावतीने विविध सोशल मीडियावर मुलाच्या अपहरणासंदर्भातील माहिती दिली. त्यामुळे आरोपी हा बारामती भागात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी आरोपीच्या लिमटेक येथील घरी धाड टाकून आरोपीस जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास पालकांकडे सुपुर्द केले. दरम्यान, पोलिसांनी तपास पूर्ण करून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन मुलाची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. आशिष कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत आरोपीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ८ वर्षांची सक्तमजुरी व ८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.