धाराशिव : शासकीय सेवेत समायोजनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. सोमवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत धरणे आंदोलन केले. जिल्ह्यातील ८०० च्या जवळपास कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील आरोग्य सेवा कोलमडली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मागील १५ वर्षांपासून आरोग्य विभागामध्ये अनेक डाॅक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुदाय आरोग्य अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, अतांत्रिक अधिकारी, कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. मात्र, त्यांचे अद्यापही शासकीय सेवेत समायोजन करण्यात आलेले नाही. शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, अशी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मागणी केली जाते. मात्र, शासनाकडून केवळ आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान, कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने ३० ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून, जिल्ह्यातील तब्बल ८०० कर्मचारी संपावर आहेत.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हा कचेरीसमोर एकत्र येत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, एकच नारा कायम करा, अशा घोषणांनी परिसर आंदोलनकर्त्यांनी दणाणून सोडला होता. आंदोलनात किरण बारकूल, राजेश पवार, डॉ. विलास तोडकर, डॉ. पंकज शिंनगारे, डॉ. विलास बोचरे, सविता माळी, किरण तानवडे आदींसह कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.