उस्मानाबाद : दहावी परीक्षेला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. २४ हजार ५९ विद्यार्थ्यांसाठी जिल्हाभरात ८४ परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी ८४ बैठे पथकांसोबतच १० भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. पथकामध्ये वर्ग एक, वर्ग दोन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.
परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी मागील तीन-चार वर्षापासून प्रशासनाकडून तगडे नियोजन केले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून बारावीच्या परीक्षेत आत्तापर्यंत एकही कॉपी केस झालेली नाही. दहावीच्या परीक्षेसाठीही शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या सुचनेनुसार नियोजन केले आहे.
जिल्हाभरातून २४ हजार ५९ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची ही संख्या विचारात घेऊन सुमारे ८४ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक २४ केंद्र आहेत. यानंतर उमरगा ११, लोहारा ८, कळंब १०, भूम ६, तुळजापूर १४, परंडा ८ आणि वाशी तालुक्यात ३ केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रावर कॉपीसारखा गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक तळ ठोकून असणार आहे. परीक्षा संपेपर्यंत पथकाने केंद्र सोडू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अशा बैठे पथकांची संख्या ८४ च्या घरात आहेत.
यासोबतच भरारी पथकांचीही दहावी परीक्षेवर करडी नजर असणार आहे. शिक्षण विभागाने १० पथकांची निर्मिती केली आहे. या पथकात वर्ग एक तसेच वर्ग दोन अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. ही पथके परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देतील. भेटी दरम्यान गैरप्रकार आढळून आल्यास संबंधिता विरोधात कारवाईचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. ही परीक्षा २२ मार्चपर्यंत चालणार आहे.
भरारी पथकाची जबाबदारी निश्चित जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार दहावी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. बैठे पथक तसेच भरारी पथकांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेशी संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी कुचराई केल्यास त्यांच्या विरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दृष्टीक्षेपात विद्यार्थी संख्यातालुका संख्याउस्मानाबाद ६८५७उमरगा ४०५१लोहारा २१३८कळंब २४७३भूम १९४७तुळजापूर ३६६०परंडा २१५४वाशी ७७०