उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली आहे, तर दुसरीकडे कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. शुक्रवारी नवीन ७० रुग्णांची नोंद झाली. ९४ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७०० इतकी आहे. जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या कमी होऊ लागली आहे. प्रतिदिन ५० ते ८० रुग्णांची नोंद होत आहे. शिवाय, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले. मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. संसर्गाचा धोका टळला नसल्याने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केल्या जात आहेत. त्यासोबतच आरोग्य विभागाच्या वतीने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व कोरोनासदृश लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयास ९०५ आरटीपीसीआर रिपोर्ट प्राप्त झाले. यात २२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शिवाय, १ हजार ३०६ व्यक्तींची ॲँटिजन चाचणी करण्यात आली होती. यामध्ये ४८ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. दिवसभरात अशा एकूण ७० रुग्णांची भर पडली. तर दुसरीकडे ९४ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७०० आहे.
परंडा तालुक्यात सर्वाधिक २१ रुग्ण
शुक्रवारी ७० रुग्णांची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक २१ रुग्ण परंडा तालुक्यात आढळून आले. उस्मानाबाद तालुक्यात १६, भूम तालुक्यात ११, कळंब तालुक्यात १०, वाशी तालुक्यात ७, तुळजापूर, उमरगा तालुक्यात प्रत्येकी २ व लोहारा तालुक्यात १ रुग्ण आढळून आला.