उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाॅजा शमशाेद्दीन गाजी रहे यांचा सध्या उरूस सुरू असून भाविकांची प्रचंड गर्दी हाेती. असे असतानाच गुरूवारी पहाटे २.३५ वाजेच्या सुमारास उरूसात सांड उधळला असता, चाैदा ते पंधरा भाविक जखमी झाले आहेत. संबंधित जखमींना तातडीने उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
उस्मानाबादेत हजरत ख्वाॅजा शमशाेद्दीन गाजी रहे यांच्या उरूसाला सुरूवात झाली आहे. बुधवारी रात्री उरूस पाहण्यासाेबतच धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी माेठी गर्दी केली हाेती. गुरूवारी पहाटेच्या सुमारासही गर्दी कायम हाेती. असे असतानाच साधारपणे २.३५ वाजेच्या सुमारास उरूसातील गर्दीत अचानक सांड उधळला. त्यामुळे भाविकांतही गाेंधळ उडाला. उरूसस्थळी उपस्थित पाेनि उस्मान शेख यांच्या पथकाने भाविकांमध्ये उडालेल्या गाेंधळावर तात्काळ नियंत्रण मिळले. तर दुसरीकडे जखमी चाैदा ते पंधरा भाविकांना माजी उपनगराध्यक्ष खलीफा कुरेशी, मसूद शेख, बबलू शेख, शमियाेद्दीन मशायक, अझहर शेख, बाबा मुजावर, जमीर शेख, अन्वर शेख, इस्माईल शेख, वाजीद पठाण यांच्यासह आदींनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
दरम्यान, जखमी रूग्णालयात दाखल हाेताच तिथे उपस्थित जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजाभाऊ गलांडे, डाॅ. कुरूंद, डाॅ. राऊत यांच्या टीमने तातडीने उपचार केले. जखमी भाविकांत सर्वाधिक अकराजण उस्मानाबादेतील असून दाेघे कर्नाटक राज्यातील तर एकजण परंडा येथील आहे.