धाराशिव : श्री तुळजाभवानी देवीच्या दागिने गहाळ प्रकरणात अखेर बुधवारी पहाटे तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला असून, त्याचे प्रमुख पोलिस उपाधीक्षक असतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
श्री तुळजाभवानी देवीस वाहिक, दान म्हणून प्राप्त झालेले दागिने तसेच पारंपारिक दागिन्यांची जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी एका तज्ज्ञ समितीकडून मोजणी करुन घेतली होती. १९६२ सालापासून असलेल्या नोंदीच्या आधारे दागिन्यांची तपासणी व मोजणी केली असता यात काही दागिने गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सोमनाथ माळी यांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तीन महंतांसह सातजणांवर जबाबदारी निश्चित करुन तक्रार देण्यात आली. चार दिवसानंतरही गुन्हा दाखल होत नसल्याने आ.महादेव जानकर यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा निदर्शनास आणून दिला होता. त्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तातडीने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. यानंतर बुधवारी पहाटे तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास हा विशेष तपास पथकाद्वारे करण्यात येणार असून, त्यात प्रमुख म्हणून पोलिस उपाधीक्षक असतील. तर त्यांच्यासमवेत एक पोलिस निरीक्षक व एक उपनिरीक्षक मदतीला असणार आहेत. या प्रकरणातील काही आरोपी मयत असल्याचेही कळते. मात्र, तपासात या सर्व बाबी समोर येतील, असे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.