वाशी (जि. उस्मानाबाद) -राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा फाक्राबाद ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन बिक्कड यांच्यावर झालेल्या गाेळीबार प्रकरणास आता वेगळे वळण मिळाले आहे. पवनचक्की ठेक्याच्या वादातूनच आपल्यावर हल्ला झाला असावा, असा संशय त्यांनी रविवारी दिलेल्या पुरवणी जबाबात व्यक्त केला आहे. आता पाेलीस या अंगानेही तपास करू लागले आहेत. गाडीचे काचही तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पाेलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
वाशी तालुक्यातील फक्राबाद येथील सरपंच नितीन बिक्कड हे १७ जून रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या थार नामक गाडीतून पारा येथे जात हाेते. वाटेतच त्यांच्या वाहनावर अज्ञात दोन व्यक्तींकडून गाेळीबार करण्यात आला. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहा. पोलीस अधीक्षक एम. रमेश, भूमचे उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा कामास लावली आहे. बिक्कड यांनी संशयित म्हणून ज्यांची नावे दिली आहेत, त्यांच्या शाेधात पाेलिसांचे पथक आहे.
असे असतानाच बिक्कड यांनी पुरवणी जबाब रविवारी पाेलिसांत दिला. त्यानुसार दिल्ली येथील रेणू सूर्या रोशनी पवन कंपनीची कामे तालुक्यातील चांदवड, घाटपिंपरी येथे सुरू होणार आहेत. या कामात भागीदार म्हणून फक्राबादचे सरपंच व कंपनीचे के. राजा कुमार, वेंडर कुलदीप देशमुख यांच्यात बोलणी सुरू हाेती. मात्र, काही दिवसांतच त्यांच्यात बिनसले. ‘‘तुम्हाला प्रेमाने कळणार नाही’’, अशा शब्दांत त्यांना यापूर्वी संबंधितांनी दम दिला हाेता. या दाेघांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर हल्ला केला असावा, असा संशय त्यांनी पुरवणी जबाबात व्यक्त केला आहे. दरम्यान, वाशी पोलिसांनी यासंदर्भात बीड, नगर आदी जिल्ह्याच्या पाेलिसांकडून तपास कार्यात मदत मागितली आहे, अशी माहिती तपास आधिकारी पवन निंबाळकर यांनी दिली.