वाशी (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी स्वत:ला विधानभवनाबाहेर पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी वेळीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. शेतजमिनीच्या कौटुंबिक वादातून या शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
सुभाष भानुदास देशमुख असे पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, मूळचे ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील रहिवासी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते मुंबईतच वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटूंबाकडे वडिलोपार्जित १६ एकर जमीन आहे. सुभाष देशमुख यांना इतर चार भाऊ होते. त्यापैकी एकजण अंध होते. काही वर्षांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने उर्वरित चार भावंडांमध्ये प्रत्येकी ४ एकर जमिनीची वाटणी झालेली आहे. सुभाष देशमुख यांच्या वाट्याला आलेली ४ एकर जमीन हे त्यांचेच एक भाऊ कसतात. दरम्यान, वाटणीत बदल करण्याची मागणी, सुभाष देशमुख करीत होते. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी शंका तांदुळवाडी स्थानिकांनी व्यक्त केली. तर त्यांच्या एका पुतण्याने नेमके कशासाठी त्यांनी हे केले, याची महिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, यापूर्वी सुभाष देशमुख यांनी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलिसांकडे कधीही कोणती तक्रार केल्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रकृती धोक्याबाहेरसुभाष भानुदास देशमुख यांनी विधानभवनाबाहेर अचानक पेटवून घेतले. यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आग विझवत त्यांना रुग्णालयात दाखल केले. यामुळे पुढील अनर्थ टळला. देशमुख यांची प्रकृती स्थिर असून २० ते ३० टक्के भाजल्याची माहिती आहे.