धाराशिव : भूम तालुक्यातील चिंचपूर ढेगे शिवारातील शेतात बुधवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला हाेता. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नाेंद करून पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता, धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून आराेपीने चक्क २६ वर्षीय महिलेच्या छातीत तसेच डाेक्यात बंदुकीची गाेळी झाडून हत्या केली. या प्रकरणी संबंधित आराेपीविरूद्ध २८ एप्रिल राेजी खुनाचा गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
चिंचपूर ढगे येथील संभाजी सुरवसे यांच्या शेतातील उसामध्ये साडीत गुंडाळलेला महिलेचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला हाेता. जाे पूर्णपणे कुजला हाेता. केवळ सापळा उरला हाेता. गावकर्यांनी ही माहिती दिल्यानंतर भूम पाेलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली हाेती. दरम्यान, महिलेचा खून झाला असावा, असा संशय बळावल्यानंतर भूम पाेलिसांनी त्यानुषंगाने तपासाची चक्रे फिरविली असता, हादरून साेडणारा प्रकार समाेर आला आहे. मयत महिलेचे नाव अमृता अमाेल बावकर (२६) असे आहे.
या महिलेस १८ ते २६ एप्रिल या कालावधीत पुणे जिल्ह्यातील पुनावळे येथे वास्तव्यास असलेल्या लक्ष्मण ऊर्फ लखन नवनाथ नागने याने अमृता हीस गावातीलच संभाजी सुरवसे यांच्या शेतातील उसामध्ये बाेलावून लग्न करण्यास गळ घातली. परंतु, संबंधित महिला विवाहित असल्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या लक्ष्मण नागने याने महिलेच्या छातीत तसेच डाेक्यामध्ये बंदुकीने गाेळी झाडली असता, संबधित महिला दगावली. यानंतर तिचा मृतदेह साडीमध्ये लपेटून उसातच टाकून दिला. आता या प्रकरणात मयत महिलेचे पती अमाेल अनिल बावकर यांनी भूम पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संबंधित मारेकर्याविरूद्ध भादंसंचे कलम ३०२ अन्वये गुन्हा नाेंद झाला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.