लोकमत न्यूज नेटवर्क तुळजापूर (जि. धाराशिव) : उन्हाची तीव्रता वाढल्याने श्री तुळजाभवानी देवीस मखमली पंख्याने वारा घालण्यासाेबतच दुपारच्या सुमारास लिंबू शरबत अथवा कैरीची पन्हे दाखविण्याची परंपरागत सेवा सुरू करण्यात आली आहे. माेठा पाऊस पडेपर्यंत म्हणजेच साधारपणे तीन महिने ही सेवा सुरू राहणार आहे.
मागील काही दिवसांत उन्हाची तीव्रता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री तुळजाभवानी देवीस मखमली पंख्याच्या सहाय्याने वारा घालण्यास सुरुवात झाली आहे. यंदा या सेवेचा मान पलंगे कुटुंबीयांकडे आहे. एवढेच नाही तर दीक्षित आणि भिसे कुटुंबीयांच्या वतीने दुपारच्या सुमारास देवीला लिंबू शरबत अथवा कैरीचे पन्हे नियमितपणे देण्यात येत आहे. बाहेर कितीही उन्ह असले तरी त्याचा त्रास देवीला हाेऊ नये, हा या सेवेमागचा उद्देश असल्याचे सेवेकरी पलंगे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.