विधानपरिषद निवडणुकीत आघाडीचा आत्मघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 07:29 PM2018-06-12T19:29:08+5:302018-06-12T19:31:37+5:30

विजयासाठी पुरेसे संख्याबळ असतानाही आघाडीच्या येथे झालेल्या पराभवाची तुलना आत्मघाताशी केली जात आहे़.

Aaghadi's suicide in the Legislative Council elections | विधानपरिषद निवडणुकीत आघाडीचा आत्मघात

विधानपरिषद निवडणुकीत आघाडीचा आत्मघात

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडे विजयासाठी आवश्यक असणारे हक्काचे बळ असतानाही येथे पराभवाचे तोंड पहावे लागले़ 

- चेतन धनुरे

उस्मानाबाद : भाजपाला रोखण्यासाठी एकीकडे विरोधी पक्षांची मोट बांधली जात असतानाच मंगळवारी आलेल्या उस्मानाबाद-बीड- लातूर विधानपरिषद निकालाने या प्रयत्नांना काहीसा धक्का बसला आहे़. विजयासाठी पुरेसे संख्याबळ असतानाही आघाडीच्या येथे झालेल्या पराभवाची तुलना आत्मघाताशी केली जात आहे़.

उस्मानाबाद-बीड-लातूर हा विधानपरिषद मतदारसंघ दिलीपराव देशमुख यांच्या रुपाने सलग तीन वेळा काँग्रेसच्या ताब्यात होता़ यावेळी देशमुख यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादीने हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याकडे घेतला. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत आघाडीचा निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादीने परभणीची खात्रीशीर जागा काँग्रेसला सोडून उस्मानाबादची जागा शेवटच्या क्षणी पदरात पाडून घेतली़ हा निर्णय जणू स्थानिक नेत्यांच्या पचनीच पडला नाही़ त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडे विजयासाठी आवश्यक असणारे हक्काचे बळ असतानाही येथे पराभवाचे तोंड पहावे लागले़ 

उस्मानाबाद-बीड-लातूर मदारसंघातील लढत ही उमेदवारांपेक्षाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठीच प्रतिष्ठेची बनली होती़ अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्यात राजकीय कुरघोड्या रंगल्या़ अगदी प्रारंभालाच राष्ट्रवादीने पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड यांना पक्षात आणून त्यांना उमेदवारी देत भाजपवर कुरघोडी साधली़ मात्र, हा आनंद राष्ट्रवादीला फार काळ टिकविता आला नाही़ रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेत राष्ट्रवादीला तोंडघशी पाडले़ त्यामुळे राष्ट्रवादीचेच मात्र, उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या अशोक जगदाळे यांना पुरस्कृत करण्याची नामुष्की ओढावली़ यादरम्यान, प्रचार कालावधीत तिन्ही जिल्ह्यांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदा घेऊन आपण एक असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला़ मात्र, प्रत्यक्षात तसे घडलेच नाही.

या मतदारसंघात एकूण १००५ इतके मतदान होते़ त्यापैकी ५२७ मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूचे होते़ तर भाजपचे संख्याबळ ३०२ होते़ सेनेचे ६५ तर एमआयएम व इतर मिळून १०२ असे संख्याबळ होते़ भाजप-सेना व उर्वरित मतदारांची संख्या एकत्र केली तरी आघाडी त्यांच्या तुलनेत जवळपास ६० मतांनी पुढे होती़  मात्र, आघाडीतील बेदिली भाजपच्या पथ्यावर पडली अन् अशक्य वाटणारा विजय आघाडीनेच भाजपच्या ताटात वाढला़ 

लक्ष्मीदर्शनाचाही चमत्काऱ़़
या मतदारसंघात भाजपचा विजय हा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही़ यात ‘लक्ष्मीदर्शना’चा मोठा वाटा आहे़ अर्थात हा योग मतदारांना दोन्ही बाजूने घडवून आणण्यात आला़ भाजपसोबतच आघाडीचे पुरस्कृत उमेदवारही यात मागे हटले नाहीत़ या स्पर्धेने तीन टप्प्यात लक्ष्मीदर्शनाचा योग घडवून आणला़  

अपात्रतेचा मुद्दा गाजला
निवडणूक जिंकायचीच या ईर्ष्येने उतरलेल्या भाजपने विरोधकांची मते घटविण्याचाही प्रयत्न केला़ बीड येथील १० नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रस्तावावर मतदानाच्या एक दिवस आधी तडकाफडकी निर्णय घेत त्यांना अपात्र ठरविण्यात आले़ तर दुसरीकडे धस यांच्या गटाच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली़ यावरुन सत्तेचा गैरवापर झाल्याची टीका भाजपवर झाली़

Web Title: Aaghadi's suicide in the Legislative Council elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.