धाराशिव : अंशराशीकरण व उपदानाची रक्कम खात्यावर जमा करून देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका वरिष्ठ सहाय्यकासह सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास ॲन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. धाराशिव आंनदनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार यांची आई ह्या ज़िल्हा परिषद शाळेतून शिपाई या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांना शासनाकडून अंशराशीकरण व उपदानाचे १५ लाख २९ हजार ८०४ रुपये मिळणार असल्याने तक्रारदार २६ सप्टेंबर रोजी धाराशिव पंचायत समितीतील लेखाविभागत गेले होते. त्यावेळी तक्रारदारास लेखा विभागातील वरिष्ठ सहाय्यक मिलिंद कांबळे व सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हनुमंत पवार या दोघांनी अंशराशीकरण व उपदानाची रक्कम आईच्या खात्यावर जमा करुन देण्यासाठी ४ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने २८ सप्टेंबर रोजी पंचायत समिती परिसरात सापळा लावला. तक्रारदार पंचायत समिती परिसरात गेले असता, नमूद दोघांनी त्यांच्याकडून ४ हजार रुपये स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नमूद दोघास ताब्यात घेऊन आनंदनगर पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दिली. त्यावरुन दोघांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.
यांनी केली कारवाईही कारवाई धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, सचिन शेवाळे, सिद्धेश्वर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर यांच्या पथकाने केली.