कळंब (जि. उस्मानाबाद) -उस्मानाबाद येथील एका ‘मॉल’मध्ये सणासाठी लागणारे काही साहित्य खरेदी करण्याकरिता पती समवेत दुचाकीवरून जात असलेल्या आंदोरा येथील एका ४७ वर्षीय गृहिणीचा दुचाकीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुचाकीच्या मागच्या चाकात साडी अडकल्याने झाला आहे.
कळंब तालुक्यातील आंदोरा येथील पांडूरंग बाबासाहेब बावणे यांच्या पत्नी राजश्री (वय ४७) यांनी मागच्या तीन -चार दिवसांपासून उस्मानाबाद शहरातील एका ‘मॉल’मधून गौरी-गणपतीच्या सणासाठी लागणाऱ्या काही साहित्यांची खरेदी करायचे नियोजन केले होते. यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पांडूरंग बाबासाहेब बावणे व राजश्री पांडूरंग बावणे हे दांपत्य दुचाकीवरून येरमाळामार्गे उस्मानाबादच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, शेगाव-पंढरपूर मार्गावरील परतापूर ते उमरा गावाच्या दरम्यान दुपारी साडेअकराच्या सुमारास पांडूरंग बावणे हे दुचाकी चालवत असताना, मागे बसलेल्या पत्नी राजश्री यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकला.
काही कळायच्या आतच राजश्री या रस्त्यावर कोसळल्या. मात्र, साडी चाकात अडकल्यामुळे त्या दुचाकीच्या मागे फरफटत गेल्या. यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होवून जखमी झालेल्या राजश्री यांना उपचारार्थ हलवण्यासाठी रूग्णवाहिका दाखल झाली, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. ऐन सणासुदीच्या तोंडावर हा दुर्दैवी प्रकार घडल्याने गावात, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.