कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील दूधगाव येथे ट्रकमधून झाडू बनविण्यासाठी लागणाऱ्या पन्हाळ्या घेऊन आलेल्या तिघांपैकी दोघांनी किराणा दुकानातील मोबाईल व गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच ढोकी पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून बारा तासांच्या आत आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
उस्मानाबाद तालुक्यातील दूधगाव येथे शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास केए २२ / सी ३७९६ या क्रमांकाचा ट्रक झाडू बनविण्यासाठी लागणाऱ्या पन्हाळ्या घेऊन आला होता. हा माल लातूर-बार्शी महामार्ग लगतच एका व्यापाऱ्याकडे खाली केला जात असताना अज्ञात ट्रक चालक व सोबतच्या दोघा व्यक्तींनी तेथे जवळच असलेल्या एका किराणा दुकानात चिवडा घेण्याच्या बहाण्याने येऊन येथील अंदाजे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल व गल्ल्यातील रोख तीन हजार सहाशे रुपये असा एकूण तेरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
ट्रकमधील माल उतरवून ट्रक गेल्यानंतर दुकान मालक गणेश पुरी (वय १९, रा. दूधगाव) यांच्या ही बाब लक्षात आली. यामुळे त्यांनी लगेचच ढोकी पोलीस ठाणे गाठून शुक्रवारी सायंकाळी तक्रार दाखल केली. ही घटना कसबे तडवळा बीट अंतर्गत असल्याने बीट अंमलदार गजेंद्र गुंजकर, पोलीस कॉन्स्टेबल श्याम छत्रे यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवून सोलापूरच्या दिशेने धाव घेतली. सोलापूर येथून शनिवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास आरोपी फारुक शमनसाब मुलतानी (वय २४), शब्बीर दस्तगीर मुलतानी (३७, दोघे रा. कौजलगी, ता. गोकाक, जि. बेलगम, कर्नाटक) यांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भादंसं कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या बारा तासांत गुन्ह्याचा तपास लावल्यामुळे बीट अंमलदार गजेंद्र गुंजकर व पोलीस कॉन्स्टेबल श्याम छत्रे यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.