उस्मानाबाद : तुळजापूर-लातूर मार्गालगतच्या एका ढाब्यावर वाद घालून ढाबा चालकावर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीने मंगळवारी रात्री रुग्णालयातून पोबारा केला. याप्रकरणी त्याच्यावर शहर ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक येथील अभिषेक विश्वकर्मा व त्याचे अन्य ५ साथीदार हे ३ फेब्रुवारी रोजी भंडारी शिवारातील एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले होते. तत्पूर्वी त्यांनी येथेच्छ मद्यपान केले. यानंतर जेवणाच्या कारणावरुन त्यांचा कामगारासोबत वाद झाला. यावेळी ढाबा चालक बाळासाहेब मोरे हे आरोपींशी बोलत असतानाच अभिषेकचा साथीदार अर्जुन बडवणे याने त्याच्याकडील बंदूक काढून दोन काडतुसे झाडली. यातील एक गोळी बाळासाहेब मोरे यांना लागली. या घटनेनंतर ५ जणांनी कारमधून तेथून पलायन केले. तर अभिषेक विश्वकर्मा यास कामगारांनी पकडून ठेवले.
यावेळी काहींनी त्यास चोप दिल्याने तो जबर जखमी झाला होता. त्याच्यावर तुळजापूर येथे उपचार करुन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी त्याने पोलिसांची नजर चुकवून रुग्णालयातून पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. शिवाय, शहर ठाण्यात याप्रकरणी अभिषेकवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पलायन केलेला आरोपी हा गुन्हेगार असून, त्याच्यावर चोऱ्या, घरफोड्यांचे बरेच गुन्हे दाखल आहेत.