कळंब (जि. धाराशिव) : पुणे येथील सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणातील फरार आरोपी आतिष जाधव याला सोमवारी कळंब येथून जेरबंद करण्यात आले. पुणे पोलीस व धाराशिव पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कार्यवाही केली.भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे वाघ हे मामा होते, त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. आरोपी जाधव हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जातेय.
पुण्यातील हडपसर भागातील सतीश वाघ हे मोठे प्रस्थ होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भाडेकरुने पूर्व वैमनस्यातून 5 लाखाची सुपारी आरोपी जाधव व त्याच्या साथीदारांना दिली होती. त्या टोळीने वाघ यांचे अपहरण करून खून केला होता. वाघ हे भाजप आमदार टिळेकर यांचे मामा असल्याने हे प्रकरण चर्चेत आले होते. याबाबत तातडीने पाऊले उचलत पुणे पोलिसांनी यातील चार आरोपीना अटक केले होते. यातील मुख्य आरोपी असलेल्या जाधवचा पोलीस शोध घेत होते.
जाधव हा धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. सोमवारी पुणे पोलिसांनी कळंब पोलिसांसोबत संयुक्त मोहीम राबवून आतिष जाधवला जेरबंद केले. जाधव याच्याकडून या प्रकरणाची आणखी उकल होईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या मोहिमेत पुणे पोलिसांना कळंबचे पोलीस निरीक्षक रवी सानप, सपोनि मगर, पोलीस कर्मचारी शेख, कांबळे, गायकवाड यांनी सहकार्य केले.